औरंगाबाद – नेहमीच वाद होणाऱ्या सुन व सासुच्या झालेल्या भांडणात शेवटी सुनेने घरातील चुली शेजारील जळक्या लाकडाने सासुच्या डोक्यात वार करुन खुन केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पाटेगाव (ता.पैठण) येथे बुधवारी घडली. कौसाबाई अंबादास हरवणे (वय ५५) असे खुन झालेल्या सासुचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुन कांचन गणेश हरवणे व सासू कौसाबाई हरवणे यांच्यात नेहमी भांडणे होत असे. मंगळवारी रात्रीही नेहमी प्रमाणे भांडण झाले. यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान या दोघी सासु-सुनामध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यात सुनबाईने घरातील चुलीजवळ पडलेले जाड अर्धवट जळालेले लाकुड सासुबाईच्या डोक्यात मारले असता सासुच्या डोक्यातुन रक्तस्त्राव सुरु झाला व सासुचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ विशाल नेहुल, पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी भेट देऊन मृत सासुचा मृतदेह पंचनामा करुन पैठण येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन मृत घोषित केले.