सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जतला पाहुण्यांकडे जाताना सांगली-जत बसमधे महिलेची पर्स चोरून त्यातून ३ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि ४५०० रुपये रोख असा १ लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना आज दुपारी सांगली बस स्थानकावर घडली.
इस्लामपूरच्या असणाऱ्या रेखा ऐवळे या जतला पाहुण्यांकडे जाण्यासाठी इस्लामपूरहून सांगलीला आल्या होत्या. त्या जतला जाण्यासाठी सांगली-जत या बस मध्ये बसत असताना गर्दी होती. बस मध्ये चढते वेळी त्यांच्या खांद्याला असलेली पर्स कोणीतरी ओढल्यासारखी वाटली. तरीही त्या तशाच बसल्या. पर्समध्ये सोन्याच्या २ बांगड्या, १ अंगठी आणि ४५०० रुपये रोख असा ऐवज ठेवला होता. ऐवज असलेली पर्स त्यांनी मोठ्या पर्समध्ये ठेवली होती. ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन लांबवली.
पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच रेखा ऐवळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे. या घटनेची सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसानी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सांगली बस स्थानकावर वारंवार चोरीच्या घटना घडत असताना सांगली पोलीस काय करत आहेत? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. वारंवार चोरीच्या घटना घडूनही पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.