हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु ’ असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकांआधी भाजपवासी झालेल्या आमदारांना साद घातली होती. दरम्यान, अजित पवारांच्या या खुल्या ऑफरवरून भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांचा खरपूस समाचार घेतला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठीच ते अशाप्रकारचे दावे करत सुटल्याची टीका पडळकर यांनी केली आहे.
अजित पवार हे दिवसाला बदलत राहणारे नेते आहेत. भाजपचं सरकार होतं तेव्हा एखादी जरी नोटीस आली तरी ते टीव्हीसमोर रडत होते. आता मात्र एखादा टग्या असल्याचा आव आणत भाषणं देत सुटले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील अजितदादांची केविलवाणी अवस्था आम्ही पाहिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरु आहे,” असा खोचक टोला पडळकरांनी लगावला आहे.
तसेच महाविकास आघाडीतील कोणताही नेता सांगत असला तरी भाजपचा एकही आमदार फुटणार नाही, असा दावा पडळकर यांनी केलाय. त्याचबरोबर तुरुंगातील सतरंजीवर झोपण्यापेक्षा तुम्हाला विश्वासघातानं राजगादी मिळाली आहे. ती गादी सांभाळा आणि लोककल्याणासाठी सत्तेचा वापर करा, असा सल्लाही पडळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलाय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’