हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या “शेतकरी अपघात विमा योजने”मध्ये सुधारणा करून ती सन 2023 -24 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणून राबविण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. या योजनेला 19.04. 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे इथून पुढे शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत. शेतकरी अपघात योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस दोन लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाणार आहे. तसेच एखाद्या शेतकऱ्याला एका अपघातात अपंगत्व आले तर त्याला कायमस्वरूपी आर्थिक मदत देखील या योजनेअंतर्गत केली जाणार आहे. याबरोबरच अपघातात शेतकऱ्याचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 2 लाख रुपये तर एक अवयव निकामी होऊन अपंगत्व आल्यास एक लाख रुपये देण्यात येणार आहेत.
योजनेसाठी पात्र कोण?
ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन आहे तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. परंतु जर ज्या ज्या नावावर शेत जमीन नाही परंतु तो व्यक्ती शेतकरी कुटुंबातील असेल तर अशा कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याच्या नावावर या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 10 ते 75 या दरम्यान असणे आवश्यक आहे.
योजनेतील अपघाताचे प्रकार कोणते?
या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचा जर रस्ता किंवा रेल्वे अपघातात मृत्यू झाला तर त्यास योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्याचबरोबर, पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा झाल्यास, विजेचा धक्का बसल्यामुळे किंवा वीज पडून मृत्यू झाल्यास अशा व्यक्तींच्या कुटुंबांना सरकार आर्थिक मदत करेल. तर, खून झाल्यास, उंचावरून पडून मृत्यू झाल्यास, सर्पदंश व विंचूदंश झाल्यास, जनावराच्या हल्ल्यामुळे, बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्यास देखील या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला पैसे मिळतील.
शेतकरी मित्रानो, तुम्हालाही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करूंन घ्या. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही शेतीशी संबंधित कोणत्याही सरकारी योजनेसाठी घरबसल्या अर्ज करून आर्थिक लाभ घेऊ शकता. हॅलो कृषी ओपन करताच समोर तुम्हाला सरकारी योजना हा विभाग दिसेल, त्यावर क्लीक करून तुम्ही तुम्हाला हव्या त्या योजनेसाठी अर्ज करू शकता. मुख्य म्हणजे यासाठी तुमचा १ रुपयाही खर्च होत नाही. याव्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये जमीन मोजणी, हवामान अंदाज, सातबारा उतारा , रोजचा बाजारभाव यांसारख्या अनेक सुविधा मोफत मध्ये मिळत आहेत. त्यामुळे उशीर कसला करताय? आत्ताच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि सर्व सुविधांचा लाभ घ्या
अर्ज कसा करावा?
एखादया शेतकऱ्याच्या मृत्यूच्या 30 दिवसाच्या आत त्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जमा करणे गरजेचे आहे. तसेच एका कागदावर अपघाताविषयी सविस्तर माहिती लिहून अर्ज तयार करावा. या अर्जामध्ये स्वतःबद्दलची माहिती, मयत व्यक्तीचे नाव, मृत्यूचे कारण, तारीख हे सर्व लिहावे. अपंगत्व आले असल्याची त्याची माहिती लिहावी. अर्जात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ लाभ मिळावा हे पहिले नमूद करावे. ही माहिती महसूल, पोलिस आणि कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करावी. यानंतर 30 दिवसांच्या आत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती शेतकरी कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेईल.
अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी?
या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर त्याच्यासोबत FIR कागद, मेडिकल रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जोडावेत. तसेच, सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस म्हणून नमुना नंबर 6 क नुसार वारसाची नोंद, आधारकार्ड, पंचनामा अहवाल, बँक पासबुक अशी सर्व महत्त्वाचे कागदपत्रे या अर्जासोबत जोडावीत.