हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासनाने सर्व कोविड सेंटरला सक्त ताकीद दिली असून, कोणीही शासनाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यासाठी पैसे घेऊ नये असे म्हटलेले आहे. तरीही, महापालिकेच्या एका कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांनी एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार चिंचवड येथे उघडकीस आला आहे. महापालिकेच्या कोविड रुग्णालयात रुग्णांना विनाशुल्क दाखल केले जात असताना लाख रुपये खुद्द डॉक्टरांनी उकळल्याने या प्रकरणी सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या डॉक्टरवर कारवाईची मागणी होत आहे.
जर महापालिकेच्या अथवा शासनाच्या कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी रुग्ण अथवा नातेवाईकांकडून पैसे घेतले असतील तर पोलिस आता त्यावर कारवाई करणार आहेत. अशी घटना घडत असेल तर संबंधितांनी थेट माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी केले आहे. कोरोना बाधित रुग्णांवर वेळेत आणि चांगले उपचार व्हावेत, यासाठी प्रशासन विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोविड रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. असे असतानाही डॉक्टरांनी रुग्णांकडून पैसे घेण्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला आहे.
उपचारादरम्यान संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे संबंधित महिलेचे नातेवाईक प्रचंड असंतोषात आहेत. नातेवाईकांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे. सुरुवातीला, टाळाटाळ करणाऱ्या महापालिका गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तिन्ही डॉक्टरांना तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. फसवणूक झालेल्या अशा नागरिकांनी पुढे येऊन थेट माझ्याशी (सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे – 9730200383) संपर्क करावा. तक्रारदारांची मागणी असेल तर त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही सहाय्यक आयुक्त डॉ. कवडे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले.