राज ठाकरे पाठोपाठ राज्यपालही औरंगाबादेत दाखल; दोघांचा मुक्कामही एकाच हॉटेलमध्ये

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये जंगी सभा असल्याने राज्यभरातून मनसेचे नेते, कार्य़कर्ते दाखल झाले आहेत. अशातच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. त्याहून महत्वाचे म्हणजे राज ठाकरे आणि कोश्यारी एकाच हॉटेलमध्ये उतरले आहेत.
राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी वाटेत अहमदनगरजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा विचित्र अपघात झाला. पहिल्या अपघातात तीन वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते अंकुश चौधरी यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले. दुसऱ्या अपघातात 7-8 वाहने आदळली होती. राज हे 30 ते 40 गाड्यांचा ताफा घेऊन औरंगाबादकडे येत होते. यानंतर राज हे औरंगाबादमध्ये दाखल झाले. परंतू क्रांती चौकात रस्ता चुकले. काल रात्री राज यांचा मुलगा अमित ठाकरे देखील रस्ता चुकले होते.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांच्या मुलगा वरुणच्या रिसेप्शनला ते आले आहेत. कराड यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वीच दिल्लीत लग्न झाले होते. त्याचे रिसेप्शन आज ठेवण्यात आले आहे. कोश्यारी राज ठाकरे उतरलेल्या हॉटेलमध्ये राहणार आहेत. राज ठाकरे देखील कराडांच्या रिसेप्शनला जाणार आहेत. 8 वाजून 30 मिनिटांनी राज ठाकरे कराड यांच्या मुलाच्या विवाह स्वागत समारंभात जाणार आहेत.