हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून अक्षरशः कोरोनाने राज्याला ग्रासले आहे. याच दरम्यान आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राज्यातील जनतेला एक आवाहन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन कोविडच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन राज्यपाल कोश्यारी यांनी जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याचे सर्व नागरिकांना आवाहन करत त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या या मंगलप्रसंगी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. आजच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यपालांनी सर्व श्रमिक बंधू भगिनींनाही शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल म्हणाले, कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. २२ एप्रिलपर्यंत सुमारे १ कोटी ३७ लाख लोकांचे लसीकरण करुन महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी आहे. राज्याच्या विनंतीवरुन केंद्र शासनामार्फत हाफकिन संस्थेस नुकतीच लस उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.