हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच ६०८ ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतीचा समावेश असून त्यातील ६ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या असून उर्वरित ५५ जागांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ३० ग्रामपंचायती मध्ये विजय मिळवून आपणच पुण्यातील किंग असल्याचे दाखवून दिले. तर शिवसेना, शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी ३ ग्रामपंचायती जिंकता आल्या. १६ ठिकाणी स्थानिक आघाडीने बाजी मारली.
आंबेगाव तालुक्यातील एकूण १८ ग्रामपंचायत निवडणुकींपैकी १४ ग्रामपंचायतीवर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गटाने झेंडा फडकावला तर शिंदे गटाला तीन, भाजपला केवळ एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला. काँग्रेस आणि शिवसेनेला आंबेगावात खातेही उघडता आले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
तर जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्या गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा राखले आहे. जुन्नर मधील ३३ ग्रामपंचायती पैकी १५ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकावला आहे. शिवसेनेला २ तर भाजपला २ ग्रामपंचायतीवर यश मिळाले. स्थानिक आघाडीला ११ ठिकाणी यश मिळाले आहे तर अपक्षांना ३ ठिकाणी यश मिळाले आहे. काँग्रेसला याठिकाणी देखील खाते उघडता आले नाही.