सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |
सध्या कोरोना संकटामुळे दोन महिने संचारबंदी असल्याकारणाने राज्यातील कामकाज बंद होते. सध्या हळूहळू कामकाज सुरु झाले असले तरी राज्याची आर्थिक व्यवस्था चांगलीच कोलमडली आहे. त्यामुळे शासकीय नोकरदारांच्या पगारात कपात करण्यात येत आहे. यासंदर्भात भीम आर्मीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी शासकीय नोकरदारांचे पगार कपात करण्याऐवजी आजी माजी लोकप्रतिनिधी यांचे मानधन तसेच पेन्शन कपात करून या कोरोना युद्धात लढणाऱ्या योद्ध्यांना मानधन द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनात त्यांनी महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात योग्य उपाययोजना केल्या आहेत असे म्हंटले आहे. राज्यातील बरेच दानशूर लोक शासनाला मदत करत असले तरीही ती अपुरी पडत असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार कापले जात आहेत. त्यामुळे या युद्धात अग्रभागी लढणाऱ्या पोलीस, महसूल, पालिका,वैद्यकीय, सफाई कर्मचारी यांचे पगार न कापता सर्व आजी-माजी लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांचे सहा महिन्याचे मानधन तसेच पेन्शन कपात करून या योद्ध्यांना मानधन द्यावे अशी मागणी भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी केली आहे.
दरम्यान राज्यातील आर्थिक स्थिती सध्या बिकट असून सरकारला कर्ज घेण्याची शक्यता भासू शकेल याचा खुलासा काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. राज्याची आर्थिक स्थिती पूर्ववत होण्यासाठी खूप कालावधी लागणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. सध्या मिशन बिगिन अगेन द्वारे संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू कामकाज सुरु केले जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.