कराड प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील
डेळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना मानणाऱ्या गटात लढत होत आहे. डेळेवाडीत निवडणूकीत 6 जागांसाठी दुरंगी सामना होणार आहे. तर सरपंच पदासाठी अर्ज दाखल न झाल्याने पद रिक्त राहणार आहे.
सत्ताधारी गटाकडून प्रभाग 1 मधून माजी सरपंच तात्यासो पांडुरंग बाबर, अपर्णा अमोल पवार, सुमन बबन बाबर. प्रभाग 2 मधून सर्जेराव वसंतराव बाबर, लता सुभाष बाबर. प्रभाग 3 मधून भीमराव मारुती बाबर, शुभांगी विजयकुमार बाबर. तर विरोधी गटातून प्रभाग 1 मधून विजया संजय बाबर, माया अंकुश खबाले, उमाताई प्रकाश बाबर. प्रभाग 2 मधून आनंदा केशव मोरे, वैशाली विजय बाबर. प्रभाग 3 मधून सुभाष पोपट बाबर, सीमा नानासाहेब बाबर हे उमेदवार आमनेसामने रिंगणात आहेत.
सत्ताधारी हनुमान, मथुरादास, भैरवनाथ विकास पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच व प्रभाग 1 मधील उमेदवार तात्यासो बाबर हे करत आहेत. तर विरोधी श्री. मथुरादास ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच सुरेश विष्णू बाबर हे करत आहेत. सत्ताधारी गट माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, माजी बांधकाम मंत्री सत्यजित पाटणकर यांचे नेतृत्वात लढत आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत डेळेवाडी येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची सत्ता होती. परंतु सध्या दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्री व उंडाळकर गट सत्तांतर घडविणार का? याकडे तांबवे, सुपने जिल्हा परिषद गटातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.