वडोदरा, गुजरात । लॉकडाउनच्या काळात महिलांवरील हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरून पतीकडून आपल्या पत्नीला मारहाण केल्याच्या घटनेत वाढ होत आहे. गुजरातमधील वडोदरा येथे अशीच एक घटना घडली आहे. लॉकडाउनच्या काळात मनोरंजन व्हावे या उद्देशाने ऑनलाइन लु़डो खेळ खेळतांना वारंवार हरल्याने नवऱ्यानं बायकोसोबत भांडणाला सुरूवात केली. हे भांडण इतकं वाढलं की नवऱ्यानं बायकोला केलेल्या बेदम मारहाणीत तिच्या पाठीचा कणा तोडला. ‘181 अभयम हेल्पलाइन’मध्ये आलेल्या तक्रारीनंतर ही घटना समोर आली.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, २४ वर्षीय वेमाली येथे राहणारी एक महिला घरात शिकवणी घेते. तर, तिचा पती एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतो. लॉकडाउनदरम्यान पतीने सोसायटीमध्ये बाहेर इतरांसोबत वेळ घालवण्याऐवजी घरातच राहावे यासाठी तिने त्याला मोबाइलवर लूडो गेम खेळण्यास सुचवले. नवऱ्यानेही लुडो खेळण्याची तयारी दाखवली, मात्र पत्नीने त्याला ३ ते ४ राउंडमध्ये हरवून टाकले. आपण हारल्याचे लक्षात आल्यानंतर नवऱ्याने पत्नीशी वाद घालायला सुरू केले. हा वाद वाढतच गेला. त्यानंतर संतापलेल्या नवऱ्याने पत्नीला मारणे सुरू केले. या मारहाणीत त्याने तिच्या पाठीत इतक्या जोराने प्रहार केले की तिच्या मणक्यात गॅप तयार झाला. अशी माहिती १८१ अभयमच्या समुपदेशकाने दिली. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
उपचारानंतर पत्नीने पतीच्या घरी जाण्यास नकार देत माहेरी जाण्याची तयारी केली होती. पण, दोघांच्या समुपदेशनानंतर पतीने पत्नीची माफी मागितली. त्यामुळे पत्नीने त्याच्यासोबत पुन्हा घरी जाण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पत्नीला पुन्हा मारहाण न करण्याची ताकीद पतीला देण्यात आली”, अशी माहिती ‘181 अभयम हेल्पलाइन’कडून देण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाउनदरम्यान देशात घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ आल्याचं वृत्त मध्यंतरी आलं होतं. त्यामध्ये या अजून एका घटनेची वाढ झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”