हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आज खूप वादळी आणि चर्चेचा ठरला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. यावेळी शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात गेलेल्या आमदार गुलाबराव पाटील यांनी भर सभेत बंडखोरीच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले. “मी १७ वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरु केले. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल असे वाटले नव्हते. बाळासाहेबांकडे पाहून आम्ही संघटनेत आलो. आमच्यावर अनेकांनी बंड केल्याची टीका होत आहे. आम्हाला जे मिळालं आहे बाळासाहेबांमुळे मिळालं आहे. आम्ही बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे,” असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले.
अधिवेशनात दुसऱ्या दिवशी आमदार गुलाबराव पाटील यांनी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी बंडखोरीवरून केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेतच आहोत त्यामुळे निवडणुका हरण्याचा प्रश्न येत नाही. ४० आमदार फुटतात ही आजची आग नाही. आम्हाला आमचं घर सोडण्याची, बाळासाहेबांना त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची आमचीही इच्छा नाही. सर्व आमदार साहेबांना त्रास सांगण्यात जात होते. पण चहापेक्षा किटली गरम. आम्ही काय सहजपणे आमदार झालेलो नाहीत. भगवा हातात घेऊनइथपर्यंत आलो आहोत.
आमच्यावर काय काय टीका करण्यात आल्या. आम्हाला गटारीचं पाणी, प्रेतं अशा धमक्या देण्यात आल्या. मात्र, याद राखा आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत. आम्ही काही लेचेपेचे नाही. हातात जोर असणारा माणूस येतो आणि सत्तेत सामील होतो. शिवसेना संपत असेल तर ती वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत, असे पाटील यांनी म्हंटले.
अजित पवारांनाही दिले प्रत्युत्तर
यावेळी गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांनी आमदार फुटण्याच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, अजितदादा म्हणतात, शिवसेना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाही. पण दादा आम्ही शिवसेना सोडली नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असं सल्ला गलाबराव पाटील यांनी दिला. तसेच आमचा साधा मेंबर फुटला तरी आम्ही विचार करतो. इथं चाळीस आमदार फुटले तरी जाग आली नाही. आम्हाला साहेबांची भेट मिळत नव्हती, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.