हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते याना चितावणीखोर भाषण केल्याच्या आरोपाखाली अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत . त्यानंतर साताऱ्यात त्यांच्यावर मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर आता कोल्हापूरातही अजून एक तक्रार दाखल झाली असून सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी बेकायदेशीररित्या पैसा गोळा केला, असा आरोप करत त्यांच्या विरोधात कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कोल्हापुरातील दिलीप पाटील यांनी ही पोलीस तक्रार दाखल केली आहे. सदावर्ते यांनी जमा केलेला पैसा कुठे गेला याची चौकशी करावी अशी मागणी या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे. तसेच न्यायाधीश रणजित मोरे यांचा अवनाम होईल अशी वक्तव्यही सदावर्ते यांनी केल्याचा देखील तक्रारीत उल्लेख केला आहे. आता या नव्या प्रकारामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी साताऱ्यातही सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर बेताल वक्तव्य केले होते. त्यानंतर राजेंद्र निकम यांनी त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलीस काल मुंबईला गेले होते. मात्र त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ झाल्याने सातारा पोलीस त्यांचा ताबा घेऊ शकले नाही.