नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने नातवाच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठी आलेल्या लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला आहे यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. पोलीस या आरोपी आजोबाचा शोध घेत आहेत. आरोपी व्यक्तीने ज्या लोकांवर गोळीबार केला त्यांच्यासोबत त्याचा जुना वाद सुरू होता. त्यामुळेच नातवाच्या मृत्यूने दु:खी झालेल्या आजोबाने आपल्या लायसन्स बंदुकीने फायरिंग केली आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना ग्वाल्हेरच्या उटीला भागातील बंधोली गावामध्ये घडली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, गावातच राहणारे परमाल सिंह परिहार यांचा १२ वर्षाचा मुलगा साहिल शुक्रवारी सायंकाळी म्हशींना चारा खाऊ घालण्यासाठी तलावाच्या किनारी गेला होता. यादरम्यान साहिल पाय घसरून पाण्यात पडला. साहिलला बुडत असताना पाहून त्याच्या साथीदारांनी त्याच्या घरी याची सूचना दिली. ते पोहोचेपर्यंत साहिलचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यानंतर साहिलचे कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन घरी पोहोचले. यादरम्यान आजूबाजूचे लोक शोक व्यक्त करण्यासाठी जमा झाले होते.
यामुळे संतापलेले परमालचे वडील म्हणजे मृत मुलाचे आजोबा उदय सिंहने आपल्या लायसन्स बंदुकीने लोकांवर फायरिंग केली. उदय सिंह यांच्या परिवाराचा शेजारी राहणाऱ्या लोकांसोबत वाद सुरू होता. अशात उदय सिंह यांना वाटलं की शेजारी लोक नातवाच्या मृत्यूची खिल्ली उडवण्यासाठी आले आहेत. याच गोष्टीमुळे नाराज होऊन उदय सिंहने लोकांवर गोळीबार केला. यादरम्यान गोळ्या लागून ६ जण जखमी झाले आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या गोळीबारानंतर उदय सिंह फरार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.