चित्रपट परीक्षण । विशाल भारद्वाज माझे आवडते दिग्दर्शक नाहीत. पण तरीही त्यांचे सिनेमे मी बघतो कारण व्यावसायिक हिंदी सिनेमांच्या उथळ भाऊगर्दीत बॉक्स ऑफिसकडे लक्ष न देता सिनेमा बनवणारे ते मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. तसेच इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे मला नेहमीच इंग्रजी साहित्यावरील रूपांतरे कशी होतात याची उत्सुकता असते. विशाल भारद्वाज सातत्याने शेक्सपिअरच्या नाटकांची रूपांतरे करत आले आहेत. त्यांची शेवटची रूपांतरीत फिल्म होती हैदर. हैदर हे शेक्सपिअरच्या सुप्रसिद्ध ‘हॅम्लेट’ या नाटकाचे रूपांतर आहे. हैदर सिनेमा येणार असं घोषित करण्यात आलं तेव्हापासून मला एक प्रश्न सतत पडत होता. भारद्वाज त्याचं रूपांतर कसं करतील. कारण तत्पूर्वी त्यांनी ‘मकबूल’ व ‘ओंकारा’ बनवताना अनुक्रमे ‘मॅकबेथ’ व’ऑथेल्लो’ या नाटकांचा आधार घेतला होता. तिन्ही सिनेमात एक साम्य आहे ते हे की या सिनेमांमध्ये भारतातील समकालीन वर्तमान व भूतकाळाचा संदर्भ आहे.
मकबूलमध्ये मुंबई अंडरवर्ल्डचा वापर होता तर ओंकारा जातीय उतरंड व राजकारणाच्या पार्श्वभूमीवर घडतो. तर हैदर नव्वदच्या दशकातील अशांत काश्मीरमध्ये घडतो. तरीहीहॅम्लेटचं रूपांतर हिंदू नायकाला केंद्रस्थानी ठेवून करता येईल का हा प्रश्न मला हॅम्लेट शिकल्यापासून पडलाहोता. मला असं वाटत आलंय की हॅम्लेट ज्या मनोवस्थेचं दर्शन घडवतो ते हिंदू धर्माचं पालन करणाऱ्या बहुसंख्यांनालागू होतं का? त्याची कारणे बरीच आहेत. पण इथे विचार करताना त्याचं सिनेमातील रूपांतर एवढाच विचार करावा लागेल. मूळ नाटकात चर्चिला जाणारा प्रसंग म्हणजे ग्रेवडिगर सीन. हॅम्लेटला पहिल्यांदामृत्यूनंतर काय होतं ते या प्रसंगात बघायला मिळतं. तो खोदून काढलेल्या प्रेताची कवटी हातात घेऊन जीवनाच्या क्षणभंगुरतेवर भाष्य करतो. हैदर सिनेमात सुद्धा असाच प्रसंग आहे. त्यातही एक कवटी हातात घेऊन हैदर हसतखेळत कावा पिणाऱ्यांसोबत जीवनावर भाष्य करतो. मला याचं रूपांतर होईल तेव्हा भारतीय मुशीत त्याच्यात बदल करताना हा प्रसंग कसा चित्रित केला जाईल याची चिंता होती. कारण विशाल भारद्वाजनी पूर्वीच्या दोन्ही रूपांतरात त्या त्या नाटकांना साजेशी पार्श्वभूमी वापरली आहे.
मॅकबेथ हा सरदारआहे; मकबूलमध्ये त्या पात्राला अंडरवर्ल्ड डॉनचा उजवा हात दाखवले आहे तर ऑथेल्लो हा व्हेनिसमधल्या मिल्ट्रीचा जनरल आहे; ओमकारामध्ये त्या पात्राला एका राजकारण्यासाठी काम करताना दाखवले आहे. दोन्ही रूपांतरे करताना भारद्वाज त्यांना पूरक अशी भारतीय पार्श्वभूमी घेतात. त्याप्रमाणे हैदरही अशांत काश्मीरमध्ये घडतो.अशी विशिष्ठ पार्श्वभूमी स्वीकारण्याचा हेतू काय?या हेतूचा विचार केला तर लक्षात येईल भारद्वाज खूप चलाखपणे याचं रूपांतर करतात. अजून स्पष्ट सांगायचं झालं तर हॅम्लेट हा धर्माने ख्रिश्चन आहे तर हैदर मुस्लीम. दोन्ही धर्मांच्या मान्यतेनुसार व्यक्ती मेल्यावर तिचंप्रेत पुरतात. त्यामुळेच मग हैदरमध्ये मुस्लीम पार्श्वभूमी ठेवणं भारद्वाजना गरजेचं वाटलं.
पण जर नायक हा हिंदू असेल तर त्याच्या कथानकात ग्रेवडिगर सीन कुठून येईल? कारण हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार व्यक्ती मेल्यावर त्याचं प्रेत जाळून टाकतात. शरीराची राख झाल्यावर ती गोळा करून नदीत सोडून देतात. मगसमजा हॅम्लेटचं रूपांतर हिंदू नायकाला घेऊन केलं तर ग्रेवडिगर सीन कसा चित्रित करावा लागेल? तत्पूर्वी तोलेखनात कसा आणायचा? कारण जर हा सीन करायचाच झाला तर हिंदू मान्यतेला तिलांजली देऊन नायकएखाद्या ख्रिश्चन किंवा मुस्लीम स्मशानभूमीत जातो व तिथे त्याला जीवनाच्या क्षणभंगुरतेचं दर्शन घडतं असं दाखवावं लागेल. मग तो नुकतंच अनुभवलेलं ज्ञान कथन करेल. पण विचार करू जाता हे तार्किकतेत बसतनाही. पटकथेत हा भाग मुद्दामहून घुसवलाय असं वाटेल. हाच विचार विशाल भारद्वाजनी केला असावा त्यामुळेच त्यांनी मुस्लीम पार्श्वभूमी निवडली. सोबत बशरत पीरच्या पुस्तकाचा आधार होताच. दुसरं कारण भारद्वाज उत्तर भारतीय ब्राह्मण आहेत. त्यांना हिंदू कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर याचं रूपांतर होणं वरील कारणासाठी शक्य वाटलं नसावं. अजून एक शक्यता आहे मकबूल व ओंकाराच्या निर्मितीमध्ये फक्त तीन वर्षांचा अंतर आहे तर हैदर ओंकारा नंतर आठ वर्षांनी प्रदर्शित झाला. इतका वेळ का घेतला असेल भारद्वाजनी.मकबूल व ओंकारा पटकथेत बसवताना त्यांना फारशी अडचण आली नसावी. त्यामुळेच मकबूल प्रदर्शित झाल्या झाल्या लगेच तीन वर्षांनी त्यांनी ओंकारा बनवला. पण हैदरसाठी त्यांना आठ वर्ष लागली. कदाचित इतरकामात असतील किंवा रूपांतर कसं करावं सुचत नसावं त्यामुळे असेल. बशरत पीरच्या पुस्तकाने रूपांतराचा मार्ग मोकळा केला. म्हणूनच असेल रूपांतर करताना ते हिंदू नायकाला केंद्रस्थानी ठेऊ शकत नाहीत. भारद्वाजची रूपांतरे मूळ नाटकाचं भारतीयकरण म्हणता येईल असं असतं. ते नाटकातील नायकाच्यामानसिकतेचा अर्क घेऊन त्याला समकालीन परिस्थितीत न दाखवता नाटकाला साजेशी पार्श्वभूमी वापरतात.
त्यामुळेच मॅकबेथ सरदार असतो तर मकबूल बंदूक चालवणारा एका अंडरवर्ल्ड डॉनचा राईट हँड. दोघेही हिंसेचे पुजारी. एका अर्थाने मूलतः वाईट माणसच. तर ऑथेल्लो गुलामीतून आलेला आहे पण गोरा नाही.गोऱ्यांपेक्षा कमी दर्जाचा म्हणून ओंकारा खालच्या जातीचा. त्यांची पार्श्वभूमी कोणती असावी याचा स्पष्ट विचार दिसून येतो. त्यामुळे नाटकाच्या मूळ कथेत बदल न करता त्यांनी पार्श्वभूमी बदलून तिला फक्त भारतीयसाज चढवतात. इथे रूपांतर करताना शेवट बदलला आहे जो नैसर्गिकरित्या पटकथेच्या चढत्या आलेखात कळसाध्यायलापोचतो. पण हॅम्लेटची शोकांतिका जी त्याच्या चालढकल करण्याच्या स्वभावात आहेत ते मात्र हैदरमध्ये कुठेचदिसून येत नाही. हैदरला एकदा समजलं की त्याच्या वडिलांच्या मृत्यूला त्याचे काकाच जबाबदार आहेत तेव्हा तो हिंदी सिनेमातील नायकाला शोभेल असा सूड घ्यायचा प्रयत्न करतो ना की चालढकल करतो. तसेच तेसुप्रसिद्ध चावून चोथा झालेलं वाक्य ‘टू बी ऑर नॉट टू बी’ एका गाण्याच्या शेवटी हिंदीतून म्हणतो. तेव्हा त्याची मनोवस्था हॅम्लेटची न वाटता फक्त हिंदी सिनेमातील नायकाची वाटते ज्याला कॉलेजच्या अभ्यासक्रमात हॅम्लेटचं नाटक शिकायला होतं बहुदा अश्या रीतीने. या उलट ऑथेल्लो हा हॅम्लेटच्या विरूद्ध स्वभावाचा माणूस आहे. डेस्डेमोनाबद्दल मत्सर निर्माण झाल्यावर तो कसलीही शहानिशा न करता तिचा खून करतो.हॅम्लेट वस्तुस्थिती समजल्यावर निर्णय घेऊन अंमलबजावणी करायला दिरंगाई करतो. ही दिरंगाईच त्याच्या शोकांतिकेचं कारण आहे. ही दिरंगाई सिनेमा अडीच तासांचा असून सुद्धा दिसून येत नाही. त्यामुळे शोकांतिका मागे पडून उरतो तो फक्त सूडनाट्याचा प्रवास.सिनेमात गाणी का आहेत हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. भारद्वाजचं गाण्यांचं आकर्षण काही कमी होत नाही. इथे सुद्धा जेव्हा काकाबद्दल माहिती मिळते तेव्हा नायक हैदर त्याच्या प्रेयसीसोबत गाणं म्हणतो. त्या ऐवजी तेवढ्याच काळात नायक-नायिका संवादातून पुढे काय करता येईल यावर बोलतात हे दाखवता आलं असतं किंवा काही प्रसंगातून. पण यामुळे होतं काय की हैदरच्या मनोवस्थेत होणारा बदल अचानक दिसून येतो ना कीटप्प्या टप्प्याने. हिंदी सिनेमांच्या पटकथेत गाण्यांना अनन्य साधारण स्थान दिल्यामुळे गाणी जेवढा वेळ घेतात तेवढ्या वेळात काही प्रसंग लिहून होतात पण मळलेल्या वाटेवरूनच प्रवास करायचा ठरवल्यावर या गोष्टीकडेदुर्लक्षच केलं जातं. भारद्वाज पण याला अपवाद ठरत नाहीत.जागतिक साहित्यकृतीचं रूपांतर करताना स्थानिक संस्कृतीचा विचार जसा केला जातो तसा तिथल्या सामाजिक परिस्थितीचा देखील. विशाल भारद्वाजसारखे माध्यमाची पूर्ण जाण असणारे दिग्दर्शक जेव्हा रूपांतर करतात तेव्हा सामाजिक-संस्कृतीमधील वरील मुद्द्याकडे का दुर्लक्ष करतात असा प्रश्न पडतो.दिग्दर्शकाच्या कलात्मक स्वातंत्र्याचा विचार केला तरी ही बाब दुर्लक्षून चालत नाही. उलट विचार करू जाता तिचं अनुत्तरीत असणं सिनेमाच्या आस्वादाला मर्यादा घालणारं ठरतं.
विवेक कुलकर्णी
genius_v@hotmail.com
लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.