दळणासाठी आलेल्या 10 वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्यास 5 वर्षे सक्तमजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये वृद्ध आरोपीला दोषी धरुन पाच वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील विशेष जिल्हा सत्र न्या. के. एस. होरे यांनी ही शिक्षा ठोठावली. आत्माराम लक्ष्मण पाचुपते असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

सरकार पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आत्माराम पाचुपते याची घरगुती आटाचक्की आहे. पिडीत दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी 19 सप्टेबर 2019 रोजी त्याच्याकडे दळण आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी संबंधित मुलगी एकटी घरी आल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरोपीने तीला घरात बोलाऊन तिच्याशी गैरवर्तन केले. त्याच्या ताब्यातून निसटून मुलगी घरी गेली. घडलेला प्रकार तीने कुटूंबियांना सांगितला. कुटूंबियांनी याबाबत ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी आत्माराम पाचुपते याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले.

खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यात पाच साक्षिदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीत मुलगी, तीची आई तसेच घटनेपुर्वी घटनास्थळावर उपस्थित असलेल्यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. तपासी अधिकारी संतोष पवार यांचीही साक्ष महत्वाची ठरली. सरकार पक्षाच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी आत्माराम पाचुपते याला दोषी धरत पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच तीन हजार रुपये दंडही ठोठावला.