हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब किंग्स इलेव्हन विरुद्ध अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) महत्वपूर्ण असा विजय मिळवला असला तरी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला मात्र BCCI च्या कारवाईला सामोरे जावं लागलं आहे. हार्दिक पांड्याला तब्बल 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी पंड्याला दंड ठोठावण्यात आला. इंडियन प्रीमियर लीग (IPL) ने याबाबत माहिती दिली. मुंबईचा संघ निर्धारित वेळेच्या २ ओव्हर मागे होता त्यामुळे नियमानुसार कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याला दंड (Hardik Pandya Fined) बसला.
यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल, दिल्ली कपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यांनाही अशाच प्रकारे स्लो ओव्हर रेट मुळे कारवाईला सामोरे जावं लागलं होते. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच स्लोओव्हर रेटमध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. दुस-यांदा दोषी झाल्यास, सदर कर्णधाराला 24 लाख रुपये आणि संघातील सदस्यांना 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25% यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात येतो आणि तिसऱ्यांदा सुद्धा हीच चूक झाली तर मग कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते.
दरम्यान, कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाबचा 9 धावांनी पराभव केला. पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत 7 विकेट गमावत 192 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 53 चेंडूत 78 धावा केल्या त्याला रोहित शर्मा आणि टिळक वर्माने साथ दिली. या धावांचा पाठलाग करताना पंजाबचा डाव 19.1 षटकात 183 धावांवर आटोपला. पंजाब कडून शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी कडवी झुंझ दिली. शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी 12 धावांची गरज होती. मात्र पंजाबचा संघ केवळ 2 धावा करू शकला आणि मुंबईने महत्वपूर्ण विजय मिळवला.