औरंगाबाद – हरिभाऊ बागडे यांनी धोका दिला, त्यांच्या वरचे एकतर्फी प्रेम भोवले असून तीन मराठा नेत्यांनी एकत्र येत एका ओबीसी उमेदवाराचा पराभव केला, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज झालेल्या जिल्हा दुध संघाच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समर्थकाच्या पराभवानंतर दिली. यासोबतच दुध संघाची चौकशी लावणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.
जिल्हा दुध संघाची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. दुध संघात आमदार हरिभाऊ बागडे यांच्या सर्वपक्षीय पॅनलने सर्वच सर्व 14 जागांवर विजय मिळवला. या पॅनलमध्ये भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षांचे नेते एकत्र आले होते. यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक चुरशीची होणार याचा अंदाज आला होता. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाल्याने निवडणुकीची उत्सुकता शिगेला होती.
दरम्यान, आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यात अपेक्षेप्रमाणे आमदार हरिभाऊ बागडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मात्र, उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आमनेसामने आले. भुमरे गटाचे दिलीप निरफळ तर सत्तार गटाचे गोकुळ सिंग राजपूत यांच्यात उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यात सत्तार गटाचा पराभव झाला. भुमरे गटाचे निरफळ 9 विरुद्ध 5 मतांनी निवडून आले. समर्थकाच्या पराभवानंतर, एका ओबीसी उमेदवाराच्या पराभवासाठी तीन मराठा नेते एकत्र आले. हरिभाऊ बागडे यांनी धोका दिला, त्यांच्या वरचे एकतर्फी प्रेम भोवले, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री सत्तार यांनी दिली. तसेच जिल्हा दुध उत्पादक संघाची चौकशी लावणार अशी घोषणाही सत्तार यांनी यावेळी केली. आ. बागडे यांच्या विरोधात फुलंब्री मतदार संघातून किशोर बलांडेंना उभे करणार असेही ते यावेळी म्हणाले.