कराड : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आहे. कराड येथील चव्हाण यांच्या निवासस्थानी बुधवारी संध्याकाळी सदर भेट झाली. या भेटीमुळे राजकिय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात पाटील यांनी ही भेट घेतली असल्याचे समजत आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा येथे भेट घेतली होती. यावेळी मराठा आरक्षणाच्या अनुसंगाने भोसले, पाटील यांच्यात चर्चा झाली. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सध्या हर्षवर्धन पाटील महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. याचाच एक भाग म्हणुन पाटील यांनी आज पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली असल्याचे समजत आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालायने काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे राज्यात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मराठा आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याच मराठा आरक्षणवरून खासदार संभाजीराजे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.