हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील साखर कारखान्यात अजून 100 कोटींचा घोटाला केला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांच्या आरोपांचे खंडण केले आहे. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. सोमय्यांचे आरोप म्हणजे भाजपचे षडयंत्र असून यामागील मास्टरमाइंड चंद्रकांत पाटील आहेत असा आरोप त्यांनी केला.
सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यामागे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं षडयंत्र आहे. आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टरमाईंड आहेत. मी अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन बोललो आहे, आवाज उठवला आहे आणि यामुळे भाजपाचे नेते मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते.
मी १७ वर्षे मंत्री, आजपर्यंत एकही डाग नाही, आता तीन वर्षात मंत्रिपदाला २० वर्षे होतील. ज्या खात्यात मी काम केलं, त्या त्या खात्यात चांगलं काम करुन दाखवलं. आम्ही चांगली कामं केली त्यामुळेच लोक माझ्यासाठी जमतात असे म्हणत महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. शरद पवारांचं नाव का घेतात? त्यांची लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचं नाव का घेता? तुरुंगात टाकणार किंवा तशी भाषा करतात, त्यांना हे थांबवावं लागेल, त्यासाठी कोर्टात जाणार आहे असा इशारा त्यांनी दिला.