Friday, January 27, 2023

आरोप सिद्ध झाल्यास कोणतीही शिक्षा भोगीन,अन्यथा सोमय्यांना जन्माचीच अद्दल घडेल;मुश्रीफांचा इशारा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी कोणतीही शिक्षा भोगीन, अन्यथा किरीट सोमय्यांना जन्माचीच अद्दल घडेल असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे. हसन मुश्रीफ सध्या बॉम्बे रुग्णालयात असून प्रसिद्धीपत्रक काढून किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला आहे.

सोमय्या यांनी वास्तविक माझ्यावर व माझ्या कुटुंबियांवर चुकीची खोटी तक्रार करून आरोप केलेले आहेत. तसेच त्यांनी आरओसीमधून मिळवलेली कागदपत्रे केंद्रीय तपास यंत्रणांकडे दिलेली आहेत. यापूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापा, चौकशी झाली आहे. तपास यंत्रणा ज्यावेळेस चौकशी करतील त्याचे योग्य उत्तर आम्ही देऊन त्यांना सहकार्य करूच. परंतु; किरीट सोमय्या यांची ही स्टंटबाजी कशासाठी..? त्यांना हा अधिकार कोणी दिला..? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला.

- Advertisement -

किरीट सोमय्यांना माझा सल्ला आहे, मराठ्यांचा शूरवीर व बाणेदार सरसेनापती संताजी घोरपडे यांचे जिवंत स्मारक असलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना त्यांनी बाहेरून नव्हे आत जाऊन पाहावा. आमचे मोजकेच लोक स्वागत करतील. जगातील हा एक अद्भुत साखर कारखाना असून खाली गाळप व उंचच-उंच डोंगरमाथ्यावर साखर तयार केली जाते. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात आलाच आहात तर माझ्या सर्व सामाजिक -राजकीय व ज्या- ज्या क्षेत्रामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली याबद्दल माहिती घ्यावी.

हा कारखाना दहा वर्षापूर्वी उभारला आहे हजारो शेतकऱ्यांच्या भाव -भावनांचे प्रतीक म्हणून त्यांच्या कष्टाच्या, घामाच्या पैशातून हे श्रममंदिर उभारले आहे. नऊ गळीत हंगाम पूर्ण होत आहेत. शिळ्या कढीला ऊत आणला जात आहे. यामध्ये काळापैसा असल्याचे सिद्ध झाल्यास कोणतीही शिक्षा मी भोगीन. अन्यथा किरीट सोमय्या यांना जन्माचीच अद्दल घडेल असा इशारा मुश्रीफ यांनी दिला.