2019 च्या पराभवाचा वचपा राजू शेट्टी यंदा काढणार?? ठाकरेंची भूमिका ठरणार निर्णायक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोष्ट आहे 2009 ची. शिरोळ मतदारसंघात वाढलेल्या आणि राजकारणाची बाराखडी गिरवत आमदारकी पर्यंत जाऊन पोहोचलेल्या आमदाराने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची (Hatkanangale Lok Sabha 2024) निवडणूक लढवण्याचा निर्धार केला…शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यानं सुरू केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावावर हा पठ्ठ्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला…ऊस पट्ट्याचं राजकारण जोरदार चालणाऱ्या हातकणंगलेमध्ये या नेत्यानं शेतकऱ्यांचं भलं मोठं नेटवर्क उभं केलं. या नेत्याचं नावं म्हणजे राजू शेट्टी…

ऊस दरवाढ आणि दुधाच्या प्रश्नांसाठी प्रस्थापित सत्ताधाऱ्यांसोबत भिडणारा नेता म्हणून शेट्टी (Raju Shetti) ओळखले जायचे…म्हणूनच आपल्या प्रश्नांना दिल्लीत आवाज मिळायला हवा यासाठी राजू शेट्टींनी खासदारकीची रिस्क घेतली…मतदारसंघात फिरून एका हाताने मत मागून दुसऱ्या हाताने निवडणुकीसाठी निधी गोळा करणाऱ्या याच राजू शेट्टींनी 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्या निवेदिता माने यांचा पराभव करत दिल्ली गाठलीच. 2014 च्या निवडणुकीतही राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि अनेक सहकारी संस्थांवर एकहाती वर्चस्व असणाऱ्या कलाप्पा आवाडे यांचा पराभव केला…खरंतर अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत आवाडे वरचढ ठरणार, असं बोललं जात होतं. मात्र महायुतीची ताकद आणि शेट्टी यांचा जनसंपर्क आवाडे यांच्यावर वरचढ ठरला आणि शेवटी राजू शेट्टी दुसऱ्यांदा हातकणंगलेमधून लोकसभेवर गेले…

Raju Shetty यंदा वचपा काढणार? ; महाविकास आघाडीचीही मिळणार साथ ? | Dhairyasheel Mane

मात्र 2019 येईपर्यंत हातकणंगलेची राजकीय गणित पूरती बदलून गेली होती…युती सोबत असलेल्या शेट्टींनी आघाडी सोबत बस्तान बांधलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीकास्त्र सोडून राष्ट्रीय पातळीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळख मिळवली…राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली. त्याचा फटका थेट सरकारलादेखील बसला होता…राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील या जागेवर शेट्टींना पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत असलेल्या धैर्यशील मानेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. हातकणंगलेच्या इतिहासातील 2019 ची निवडणूक सर्वाधिक अटीतटीची आणि अनेक अंगांनी महत्वपूर्ण ठरली…यावेळेस मैदानात होते सलग दोन टर्म खासदार राहिलेले राजू शेट्टी आणि त्यांच्या विरोधात 5 वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेल्या माने घराण्यातील धैर्यशील माने यांच्यात! राष्ट्रवादीने आधीच शेट्टी यांना सपोर्ट देऊ केला होता. तर शेट्टींना पराभूत करण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपनं सर्व ताकद माने यांच्या पाठिशी उभा केली होती. माने गट, शिवसेनेची ताकद आणि राष्ट्रवादी तसेच कारखानदारांची छुपी मदत याच्या जोरावर धैर्यशील मानेंनी 96 हजार मतांनी शेट्टींचा धुव्वा उडवला आणि हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचा पहिल्यांदाच भगवा फडकवला…

राजू शेट्टींसाठी हा धक्का न पचणारा होता…मात्र शेट्टींच्या पराभवाला काही प्रमाणात वंचित फॅक्टर कारणीभूत ठरला…वंचित एमआयएमच्या युतीनं हातकणंगलेमधून अस्लम सय्यद यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. सय्यद यांनी लाखभर मतं घेतल्यामुळे शेट्टींच्या विजयातील हा सर्वात मोठा अडथळा ठरला होता… मात्र ठाकरे कुटुंबाच्या गुडबुकमधील असणाऱ्या पहिल्याच टर्ममध्ये खासदार झालेल्या धैर्यशील माने यांनी मात्र शिवसेनेच्या बंडाळीत शिंदेंना साथ दिलीये. त्यामुळे दुहेरी लढत पाहायला मिळणाऱ्या हातकणंगलेमध्ये आता साधी सोपी लढत पाहायला न मिळता मतदारसंघात बरीच गुंतागुंत वाढलीय. ऐनवेळी शिवसेनेत आलेल्या धैर्यशील मानेंना लोकांनी उचलून धरले. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची विशेष मर्जी असलेले धैर्यशील माने हे शिंदे गटात गेल्याने लोकांमध्ये बरीच नाराजी आहे. तसेच मधल्या काळात त्यांचा जनसंपर्कही तुटल्याचं बोललं जातं. त्यामुळे सध्या शिंदे गटात असलेल्या मानेंना या नाराजीला डावलून आधी महायुतीकडून तिकीट मिळवण्यासाठी आणि सोबतच मतदारसंघावर पुन्हा पकड मिळवण्यासाठी दुहेरी संघर्ष करावा लागणारय…

दुसरीकडे विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्यावर आता राजू शेट्टी एकट्याने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करतायत…. राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते कोल्हापूरमध्ये येण्याची वाट सुद्धा न पाहता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी अत्यंत कठोर शब्दात या भेटीवर टीका केली. यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मुरलीधर जाधव यांच्यावर कारवाईचा आसूड ओढण्यात आला. मुरलीधर जाधव यांची तडकाफडकी जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली…हा सगळ्या घटनांचा सिक्वेन्स पाहता राजू शेट्टी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असा एकंदरीत अंदाज बांधला जाऊ लागलाय. जर असं झालं नाही तर जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांचंही नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत सर्वात टॉपला आहे. परंतु राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशा विनंती मातोश्रीवर जाऊन केली आहे, त्यामुळे ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात ते पाहायला हवं. बंडखोरी करणाऱ्या धैर्यशील मानेचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे राजू शेट्टींच्या मागे आपली ताकद लावण्याची शक्यता आहे.

पक्षीय बलाबलाचा विचार केला तर शाहूवाडी मतदारसंघातून भाजपाला पाठिंबा दिलेल्या जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे खासदार आहेत…हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवाळे, इचलकरंजीमधून अपक्ष मात्र भाजप समर्थक प्रकाश आवाडे, शिरोळ मतदारसंघातून अपक्ष असलेल्या शिंदे गटाचे राजेंद्र यड्रावकर, शिराळा मधून राष्ट्रवादीचे मानसिंग नाईक तर इस्लामपूरमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विद्यमान आमदार आहेत… म्हणजेच एकंदरीत विचार करायचा झाला तर इथं महायुती, आघाडी आणि राजू शेट्टी या सगळ्यांनाच सध्या हातकणंगले मतदारसंघात सेम स्कोप आहे. बाकी महादेवराव महाडिक जिल्ह्यातील अनेक आमदार ठरवतात. यंदा त्यांची ताकद भाजपच्या पाठीशी आहे. त्यासोबत जनसुराज्य पक्षाच्या प्रभाव क्षेत्रात धैर्यशील माने यांना मोठं मतदान मिळू शकतं. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांची मोट बांधणारे धैर्यशील माने पुन्हा एकदा बाजी मारणार की राजू शेट्टी संसदेत कमबॅक करणार? की या सगळ्यांना सोडून नवा चेहरा मतदारसंघाला आमदारकीला मिळणार या सगळ्याची उत्तरं सध्यातरी गुलदस्त्यातच आहे.