नवी दिल्ली । कोरोनामुळं तयार झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सगळ्याच कॉर्पोरेट कंपन्या आता वेतन कपात आणि कर्मचारी कपात करत असताना कर्मचारी बोनस आणि पगारवाढीची अपेक्षाही करू शकत नाहीत. पण एचसीएल टेक यासाठी अपवाद ठरली आहे. एचसीएल टेक्नोलॉजीसने आपल्या दीड लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. शिवाय कंपनीकडून गेल्या वर्षीच्या कामाचा बोनसही दिला जाणार असून कर्मचारी कपात होणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. कर्मचाऱ्यांनी गेल्या १२ महिन्यात केलेल्या कष्टाचं फळ त्यांना देणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. यापूर्वीही कंपनीने अशीच वचनबद्धता जोपासली असून आताही जोपासली जाईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.
एचसीएल टेक्नोलॉजीज ही देशातील सर्वात मोठी तिसरी सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी आहे. या कंपनीचं मुख्यालय दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये आहे. कोरोनाचा कंपनीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. पण या संकटाला तोंड देण्याची तयारी कंपनीने केली आहे. वार्षिक पगारवाढ ही जूनच्या अखेर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एचसीएल टेकचे एचआर प्रमुख आप्पाराव व्हीव्ही यांनी दिली आहे. वेतन कपात किंवा बोनस न देणे हे प्रकार होणार नाहीत, असंही कंपनीने सांगितलं आहे. कंपनी जो बोनस देते, तो कर्मचाऱ्यांनी गेल्या १२ महिन्यात जे परिश्रम केले आहेत, त्याचा मोबदला असतो आणि आपली वचनबद्धता आपण जोपासली पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. २००८ ची जागतिक मंदी असो किंवा इतर संकट असो, एचसीएलने कधीही कर्मचाऱ्यांच्या वेतनाला धक्का लागू दिला नाही. हाच विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असं अप्पाराव म्हणाले.
कोरोनाच्या संकटात सुद्धा एचसीएल टेक कंपनीने नोकर भरती थांबवली नाही आहे. कंपनीने अगोदरच १५ हजार फ्रेशर्सना नोकरीची ऑफर दिली होती. हे सर्व जॉब देणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. करोना संकटामुळे एकही प्रोजेक्ट रद्द झालेला नाही. पण नवीन प्रोजेक्टच्या कामाला मात्र विलंब झाला आहे. पण यातही अनेक चांगल्या गोष्टींकडे आम्ही पाहत आहोत. त्यामुळे जिथे आवश्यकता आहे तिथे आम्ही नोकर भरतीही करत आहोत, असंही आप्पाराव यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”