पुणे । सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. जवळपास साडेतीन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र या अग्नितांडवात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली. दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही
जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेटनंबर ३,४ आणि ५ या परिसरात बनवली जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.
नव्या बिल्डिंगमध्ये BCG लसीचं काम?
ज्या बिल्डिंगला आग लागली त्या इमारतीत BCG लस बनवण्याचं काम चालतं. मात्र या इमारतीत मोठ्या प्रमाणात साठा नव्हता. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’