हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या वर्षभरात देशभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणू वर अखेर लस आली असून राज्यात येत्या 16 तारखेपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापसून प्रत्यक्ष लस देण्याच्या कामाला प्रारंभ होईल. मात्र, कोरोनाची ही लस घेतल्यानंतर काही किरकोळ दुष्परिणाम (Side effects) जाणवू शकतात. असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
राजेश टोपे म्हणाले, कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काहीजणांना किरकोळ त्रास जाणवू शकतो. यामध्ये लस दिलेल्या भागात सूज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा लक्षणांचा समावेश आहे. तर काहीजणांना ताप येणे किंवा चक्कर येण्यासारखी सामान्य लक्षणे जाणवू शकतात. शरीराला खाज येणे किंवा घाम सुटणे ही लक्षणे सामान्य नसली तरी त्यामुळे जीवघेणा धोका उद्भवणार नाही, अशी हमी राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार देऊ नये. तुम्ही लस घेऊन अशिक्षित लोक आणि ग्रामीण भागापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवला पाहिजे, असे आवाहन राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’