भरती परीक्षेचे ‘आरोग्य’ बिघडलेलेच ! एका उमेदवाराला आले तब्बल 34 हॉलतिकीट

बीड – आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होत आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक-दोन नव्हे तर तब्बल 34 हॉलतिकीट आले आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. आता या विद्यार्थ्याने परीक्षा द्यायची कुठे? असा प्रश्न आहे. यानिमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

पृथ्वीराज अरुण गोरे (रा. शहाबाजपूर, ता.जि. बीड) या विद्यार्थ्याने 20 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. यात त्याने औरंगाबाद विभागाची निवड केली होती. मात्र, त्याला एक-दोन नव्हे तर तब्बल 34 हॉलतिकीट मिळाले आहेत. हे पाहून पृथ्वीराजही अवाक् झाला. त्याने हॉलतिकीटवरील क्रमांकावर संपर्क साधला. यावर त्याला एकाने औरंगाबाद, तर दुसऱ्याने राज्यात कुठेही परीक्षा देण्याचा सल्ला दिला.

एकदा परीक्षा झाली रद्द, आणि आता पुन्हा –
आरोग्य विभागाने एका खासगी संस्थेमार्फत ही पदभरती सुरू केली आहे. या अगोदर मोठा गोंधळ झाल्याने विद्यार्थी केंद्रावर पोहोचल्यानंतरही अचानक परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यानंतर 24 ऑक्टोबरला गट क पदासाठी परीक्षा झाली. आता 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेतही एकाच विद्यार्थ्याला तब्बल 34 हॉलतिकीट देऊन गोंधळाचा कळस गाठला आहे.

आरोग्य विभागाकडून प्रतिसाद नाही
या प्रकरणाबाबत आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे आणि आयुक्त एन. रामास्वामी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. डॉ. पाटील यांनी संदेश करण्याचा सल्ला दिला, तर डॉ. तायडे व रामास्वामी यांनी फोनला प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.