हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मुद्द्याने अक्षरशः रान उठवले आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून अजूनही ठोस असा पर्याय मराठा आरक्षणावर निघालेला नाही. त्यातच मराठा समाज राजकीय नेत्यांबाबत आक्रमक झाला असुन अनेक गावांत नेत्याना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिंदे गटाच्या खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) असे या खासदारांचे नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी काही आंदोलकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी हेमंत पाटील यांच्या कडे केली. त्यांच्या या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे स्वतःच्या लेटर हेडवर राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.असं पत्र लोकसभा अध्यक्षांच्या नावे रविवार २९ ऑक्टोबर रोजी खासदार हेमंत पाटील यांनी लिहिलं आहे.