हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंगळुरू येथील शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने महिला विद्यार्थिनींना 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या द्वितीय वर्षाच्या पीयू वार्षिक ( Class XII Board Exam) परीक्षेस बसताना हिजाब घालण्यास नकार दिला आहे. परीक्षेस हिजाब घालून बसण्याची परवानगी देण्याची विनंती विद्यार्थिनींकडून करण्यात आली होती. मात्र पदवीपूर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि इतरांना हिजाब घालण्याची परवानगी नाही असं प्रशासनानं सांगितलं आहे.
हिजाबचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे वार्षिक परीक्षेदरम्यान हिजाब घालण्यास परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. अशा परिस्थितीत कोणत्या मुली परीक्षेत नापास होतात, याकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही, असे शालेय शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी यावेळी सांगितले.
विभागातील सूत्रांनी सांगितल्यानुसार, उडुपी, चिक्कबल्लापूर, चामराजनगर आणि बंगळुरू ग्रामीण जिल्ह्य़ातील पदवीपूर्व महाविद्यालयातील काही मुस्लिम महिला विद्यार्थिनींनी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना हिजाब घालून परीक्षा देण्यास परवानगी द्यावी अशी याचिका केली होती. गेल्या आठवड्यात, परीक्षेसाठी हिजाब घालण्याच्या परवानगीसाठी दोन विनंत्या सुद्धा आल्या होत्या मात्र आम्ही त्या स्पष्टपणे नाकारल्या आहेत असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेचे नियम अनिवार्यपणे पाळले पाहिजेत असेही दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले.