कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील येणके येथे ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करून यापुढे गावात कोणतीही निवडणूक न घेता सर्व निवडणुका बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय गावाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून आनंदोत्सव साजरा होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राहुल गरुड तर व्हाईस चेअरमनपदी रामभाऊ कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राजकीय दृष्ट्या येणके गाव संवेदनशील म्हणून ओळखले जाते. गावची ग्रामपंचायत असो की सोसायटी निवडणूक असो किंवा सहकार क्षेत्रातील कोणतीही निवडणुका असो या निवडणुकांच्यामुळे गावात नेहमीच वातावरण तापलेले असते. निवडणुकांच्यामुळे एकमेकांमध्ये वाद निर्माण होऊन तो वाद विकोपाला गेल्याच्या घटना कित्येकदा गावात घडलेल्या आहेत. मात्र, यापुढे गावात कोणतीही निवडणूक घ्यायची नाही. तर ग्रामपंचायत व सोसायटीच्या निवडणूका ग्रामस्थांच्या पातळीवरती बिनविरोधच करायच्या असा सर्व ग्रामस्थांच्या वतीने ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. गेल्या 30 वर्षात पहिल्यांदाच ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात सर्व ग्रामस्थांना यश आले. तसेच 25 वर्षात पहिल्यांदाच विकास सेवा सोसायटी बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय गाव एकत्र एकवटल्याचे दिसून आले. येणके गावात काँग्रेसचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र अँड. उदयसिंह पाटील व भाजपाचे डाॅ. अतुल भोसले या तिन्ही गटाला मानणारा प्रबळ गट गावात आहे.
यापूर्वी ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटीची सत्ता आपल्याकडेच खेचून आणण्यासाठी सर्वजन आटोकाट प्रयत्न करत. निवडणुका म्हटले की वाद-विवाद आलाच. त्याप्रमाणे येणके गावही अपवाद नव्हते. मात्र गावातील काही जाणकार, सुशिक्षित तरुण मित्र व ज्येष्ठ लोकांनी यापुढे गावात कोणतेच इलेक्शन लावायचे नाही,असा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे गावच्या हनुमान मंदिरात ग्रामस्थांची सभा बोलावली व अनेक विषयावर खलबते झाली. वास्तविक बिनविरोध निवडणूक करायची का नाही यावर अनेक पक्षातील कार्यकर्त्यांच्या वैचारिक उलथापालथी चालू होत्या. ‘मात्र गाव करील ते राव काय करील ‘ या उक्तीप्रमाणे गावातील हनुमान मंदिरात तीन वेळा ग्रामस्थांच्या बैठकी झाल्या. काही वेळा थोडाफार शाब्दिक संघर्षही झाला. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये गावात बिनविरोध निवडणूक व्हायलाच हवी असा काही लोकांनी, तरूण मित्र, ज्येष्ठ नागरीक व गावातील ग्रामसेवा प्रतिष्ठान , तंटामुक्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चंग बांधला होता.
नवनिर्वाचित सोसायटीचे बिनविरोध पदाधिकारी
नुकत्याच झालेल्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी राहुल गरुड ,व्हाईस चेअरमनपदी रामभाऊ कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर संचालक म्हणून आनंदराव गरुड , धनंजय पाटील, जयवंत गरुड, संपतराव गरुड, रघुनाथ गरुड, आनंदा गरुड, संजय सुतार, यदु कसबे, सौ. सुरेखा गरुड, सौ. कलावती गरुड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.