कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव (ता.हातकणंगले) येथे 21 आणि 22 मार्च 1920 रोजी पहिली ऐतिहासिक परिषद भरली होती. याचा शताब्दी महोत्सव समारंभ 21 मार्च, 2020 रोजी माणगांव (ता.हातकणंगले) येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
माणगांव परिषद शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्याबाबतची बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी मुंडे बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राजू (बाबा) आवळे, ‘बार्टी’चे महासंचालक कैलास कणसे व अधिकारी उपस्थित होते.
माणगांव परिषदेचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व बार्टीमार्फत माणगांव परिषदेच्या शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी माणगांव परिषद शताब्दी समितीमार्फत विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शताब्दी महोत्सवासाठी आवश्यक तो सर्व निधी बार्टीमार्फत देण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.