Holi Colors : होळीच्या रासायनिक रंगांमुळे लागेल आरोग्याची वाट; कशी घ्याल काळजी?

0
1
Holi Colors
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Holi Colors) संपूर्ण देशभरात होळीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. पूर्वी नैसर्गिक पद्धतीने फुलांचा वापर करून बनवलेला गुलाल, रंग, होळीची राख आणि पाणी मिसळून होळी साजरी केली जायची. मात्र, गेल्या काही दशकांत रासायनिक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे रंग नैसर्गिक रंगांपेक्षा स्वस्त असले तरी आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच महागात पडतात. कारण या रंगांमध्ये कॉपर, सल्फेट आणि लीड पावडर सारख्या घातक रसायनांचा समावेश असतो. या रंगांनी होळी खेळल्यास आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. चला तर जाणून घेऊया होळीसाठी रासायनिक रंगांचा वापर केल्यास होणारे दुष्परिणाम आणि त्यावर करावयाचे उपाय.

रासायनिक रंगांमुळे होते केस आणि त्वचेचे नुकसान (Holi Colors)

कृत्रिम रंग बनवण्यासाठी कॉपर सल्फेट, ॲल्युमिनियम ब्रोमाइड, लीड ऑक्साईड आणि एस्बेस्टोससारखी घातक रसायने वापरलेली असतात. अशी रसायने केसांच्या वा त्वचेच्या संपर्कात आल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे केस गळणे, केसात कोंडा होणे, केसांचा रंग सफेद होणे, केस कोरडे होणे तसेच त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता असते. परिणामी ऍलर्जी, खाज येणे, पुरळ उठणे वा यापेक्षा गंभीर स्वरूपातील त्रास होऊ शकतात.

कृत्रिम रंगांपासून वाचण्यासाठी केसांची कशी काळजी घ्याल?

होळीच्या रंगांपासून केसांचे रक्षण करण्यासाठी रंग खेळायला जाण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल लावा. यामुळे रंग केसांच्या मुळाला जाऊन चिकटणार नाही आणि यामुळे केस साफ करणे सोप्पे जाईल. मुख्य म्हणजे, रंग खेळल्यानंतर केस धुताना आधी साध्या पाण्याने धुवून घ्या आणि पूर्ण रंग निघाल्यानंतर गरम पाण्याने साफ करा. (Holi Colors) केस धुताना चांगला शॅम्पू वापरा आणि त्यानंतर चांगला कंडीशनर देखील लावा. म्हणजे केस खराब होणार नाहीत.

याशिवाय केसांना लागलेला रंग घासून स्वच्छ करू नका. यामुळे केस तुटण्याचा धोका असतो. अशा वेळी कोरडा रंग रुंद कंगव्याच्या मदतीने हलक्या हाताने काढून घ्या. केसांमध्ये जर फक्त कोरडा रंग असेल तो थेट पाण्याने धुवू नका. यामुळे तो चिकट होतो आणि केसांच्या मुळांचे नुकसान करतो. (Holi Colors)

अँपल सायडर व्हिनेगर

होळी खेळताना वापरले जाणारे सगळे रंग चांगले नसतात. काहींमध्ये रसायनांची मात्रा प्रचंड असते. असे रंग तुम्ही कितीही काहीही करा केसातून लवकर निघत नाहीत. (Holi Colors) अशा वेळी अँपल सायडर व्हिनेगरचा वापर करून हा रंग काढला जाऊ शकतो. कारण, अँपल सायडर व्हिनेगर केसांमध्ये चिकटून बसलेला रंग काढून टाकण्यास सक्षम आहे. याच्या वापराने केसांना येणारी खाज आणि संसर्ग यांपासून देखील बचाव होतो.

वापर – केस स्वच्छ करण्यासाठी किमान १ १/२ ते २ चमचे अँपल सायडर व्हिनेगर १ कप पाण्यात मिसळून केसांना लावा. यानंतर चांगल्या पाण्याने केस धुवून घ्या.

लक्षात ठेवा – अँपल सायडर व्हिनेगरनंतर कधीही शॅम्पू किंवा कंडिशनरचा वापर करू नका. अन्यथा केसांचे नुकसान होऊ शकते.

कृत्रिम रंगांपासून वाचण्यासाठी त्वचेची कशी काळजी घ्याल?

रासायनिक रंगांपासून त्वचेचे संरक्षण करायचे असेल तर होळीच्या आदल्या दिवशी संपूर्ण शरीराला तेल लावून मसाज करा. यामुळे त्वचेच्या आत तेल जाऊन त्वचा हायड्रेटेड राहील. परिणामी होळी खेळताना रंग त्वचेच्या आत जाणार नाही. तसेच रंग खेळायला जाण्यापूर्वी पूर्ण शरीराला बॉडी लोशन लावा. (Holi Colors) तसेच डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागावर आणि ओठांवर व्हॅसलीन लावा. पापण्या आणि नखांना थोडेसे बेबी ऑइल लावा. यामुळे रंग शरीराच्या थेट संपर्कात येणार नाही. याशिवाय, रंग खेळायला जाताना नेहमी पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. यामुळे जास्तीत जास्त त्वचा झाकली जाईल आणि थेट रंगाच्या संपर्कात येणार नाही.

त्वचेवरून रंग काढताना ‘अशी’ घ्या काळजी

त्वचेवरून होळीचा रंग काढण्यासाठी संपूर्ण चेहऱ्यावर लाईट फेस वॉश आणि बॉडी वॉशचा वापर करा. याशिवाय मेकअप रिमूव्हरचा देखील वापर करू शकता. त्वचेवरून रंग काढताना रॅशेस येणार नाहीत याची काळजी घ्या. बऱ्यापैकी रंग निघाल्यावर थेट गरम पाण्याने अंघोळ करू नका. यामुळे शरीर अधिक कोरडे होते. परिणामी त्वचेला जळजळ आणि खाज सुटते. त्यामुळे कोमट पाणी घेऊन शरीर स्वच्छ करा. नंतर बॉडी लोशन आणि चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. (Holi Colors)