हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 6 डिसेंबर 2023 रोजी म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील सर्व शासकीय/निम शासकीय कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आलेल्या शासकीय परिपत्रकातून 6 डिसेंबरच्या सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. ही सुट्टी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहे. यापूर्वी 6 डिसेंबर रोजी कामकाजासाठी सर्व सरकारी कार्यालये सुरु असायची. मात्र आता ती 6 डिसेंबरला बंद राहणार आहेत.
सुट्टी संदर्भात प्रशासन विभागाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, “मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी ‘अनंत चतुदर्शी’च्या दिवशी आणि 2007 पासून गोपाळकाला निमित्तान मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता 2023 मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना तिसरी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे”
दरम्यान, 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंपेक्षा जास्त नागरिक चैत्यभूमीवर येत असतात. त्यामुळे 6 डिसेंबर रोजी मुंबईत कडक बंदोबस्त राबवला जातो. तसेच प्रशासनाकडून चैत्यभूमीवर सर्व सोयीसुविधा पुरवल्या जातात. इतकेच नव्हे तर, चैत्यभूमीला जाण्यासाठी रेल्वे विभागाकडून विशेष ज्यादा गाड्या सोडण्यात येतात. या सर्व पार्श्वभूमीवरच मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.