हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोनाची लागण झाली असून त्यांनी याबाबतची माहिती स्वत: ट्वीट करत दिली आहे. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
मंत्री वळसे पाटलांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे,” असे ट्वीट दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 28, 2021
सध्या दिलीप वळसे पाटील वैद्यकीय उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाल्याची दिसून येत नसून रुग्णाची संख्या अजूनही आढळून येत असल्यामुळे दिवाळी सणांमध्ये खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.