गृहमंत्र्यांचा तातडीनं राजीनामा द्यावा.., सुप्रिया सुळेंची थेट मागणी

Supriya Sule
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “मराठा आंदोलन हे गृहमंत्र्यांना झेपत नाही, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा” अशी मागणी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे. तर, राज्यातील आमदारांच्या घरावर हल्ला होतोय कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे, हे राज्य सरकारचे अपयश आहे, अशी टीका देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

आज मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी आक्रमकची भूमिका घेत आमदार प्रकाश साळुंखे यांच्या घराला आग लावली. या घटनेविषयी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, “महाराष्ट्रात एका आमदाराच्या घरामध्ये जाळपोळ होतेय ही अतिशय गंभीर घटना घटना आहे. त्यामुळे मी प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती करते की, त्यांनी राज्यातल्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. माजलगावच्या पंचायत समितीमध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडली. हे राज्य सरकारचं अपयश आहे” अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, रविवारी मध्यरात्री पुण्यात एका व्यक्तीवर घरात घुसून गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमुळे पुण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून देखील सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. “राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. जे ‘पार्ट टाईम’ गृहमंत्री महोदय आहेत, त्यांना आमदार फोडाफोडी आणि इतर राजकारण करण्यातून वेळ मिळत नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे फावले असून ते राजरोसपणे गुन्हे करत आहेत. सरकारचे गृहखाते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे” अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.