हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळी सुट्टीमुळे पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी घोडेस्वारीचा आनंद लुटत आहे. बुधवारी सायंकाळी घोडेस्वारी व्यवसाय केल्यानंतर घरी परतत असलेल्या घडेमालक आयुब महामुद यांच्यावर एक जीवघेणा प्रसंग ओढवला. महाबळेश्वर येथील वेण्णालेक फुटपाथवरील पथदिव्यांच्या खांबाला त्यांच्यासोबत असलेलया घोड्याचा स्पर्श झाला. यामध्ये विजेच्या धक्क्याने त्यांच्या ‘नागराज’ या घोड्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी घोडे मालक आयुब महामुद वारुणकर यांनी पोलीस ठाण्यात अर्ज देत कारवाईची मागणी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर येथील प्रसिध्द वेण्णालेक येथे उन्हाळी हंगामामुळे पर्यटकांची गर्दी होत आहे. हौशी पर्यटकांची घोडे सवारीचा आनंद लुटत आहरेत. या ठिकाणी घोडे मालक आपले घोडे घेऊन घोडेस्वारीतून दिवसभर व्यवसाय करत आहेत. सकाळी घोडे घेऊन येत दिवसभर व्यवसाय करून परत सायंकाळी सुर्यास्तानंतर घोडे व्यावसायिक आपले घोडे घेवून घरी परतात. बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे येथील घोडे व्यावसायिक आयुब वारुणकर हे वेण्णालेक येथील फूटपाथवरुन नागराजला घेऊन परतत होते. इतक्यात वाहनतळानजीक असलेल्या फुटपाथवरील पथदिव्याच्या लोखंडी खांबास घोड्याचा स्पर्श झाला. विजेच्या जबर धक्क्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाला तर आयुब हे मात्र थोडक्यात बचावले.
या घटनेनंतर आयुब यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. घडलेल्या सर्व घटनेची माहिती त्यांनी अर्जाद्वारे पोलिस ठाण्यात दिली. तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.