सांगली | सांगली शहरात शासनाच्या लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सिव्हिल रोडवरील अनुराधा हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. सांगली शहर पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून सदर हॉटेल हे सील करण्यात आले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त एस. एस. खरात यांनी ही कारवाई केली.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाकडून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय सेवा आणि मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याबाबत सक्त आदेश आहेत. याबाबत उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाईबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सूचना दिल्या होत्या. आज दुपारी शहर पोलीस निरीक्षक अजय सिंधकर हे सिव्हिल रोडवरून जात असताना त्यांना हॉटेल अनुराधा हे सुरू असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत सिंधकर यांनी तातडीने सहायक आयुक्त एस. एस. खरात यांना बोलावून घेत संबंधित हॉटेलवर लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्याची सूचना केली. यावेळी सहायक आयुक्त एस एस खरात मनपा आयुक्त मा नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार प्रमोद कांबळे, स्वच्छता निरीक्षक राजू गोंधळे, किशोर कांबळे, नासिर जांबळीकर यांच्या मदतीने हॉटेल अनुराधावर सिलची कारवाई केली.