अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीने BCCI ची चिंता कशी वाढवली ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य आले आहे. तालिबान्यांनी राजधानी काबूलवरही कब्जा केला आहे. राष्ट्रपती भवनावर तालिबानचा झेंडा फडकल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी राजीनामा देण्याची घोषणा करत देश सोडला. अफगाणी लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. मोठ्या संख्येने लोकं देश सोडून जात आहेत. अलीकडेच, अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर रशीद खानने जागतिक नेत्यांना आवाहन केले होते की,” त्यांना या संकटात मरण्यासाठी सोडू नका.”

गेल्या काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचा चांगला विकास झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करण्याबरोबरच, आयपीएलसारख्या मोठ्या लीगमध्ये अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंनीही आपली क्षमता सिद्ध केली. पण आता बीसीसीआयला रशीद खान, मोहम्मद नबी सारख्या अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंची थोडी काळजी वाटते आहे.

दोन्ही खेळाडू अफगाणिस्तानात नाहीत
खरं तर, आयपीएल 2021 चा दुसरा हंगाम पुढील महिन्यात यूएईमध्ये खेळला जाईल आणि दुसऱ्या सत्रात अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. रशीद आणि नबी सध्या अफगाणिस्तानात नसले तरी ते इंग्लंडच्या हंड्रेड लीगमध्ये खेळत आहे. रशीद ट्रेंट रॉकेट्सचे प्रतिनिधित्व करत असताना, नबी लंडन स्पिरिटसाठी खेळत आहे. बीसीसीआय या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आयपीएलमध्ये भाग घेतील अशी आशा आहे.

राशिद आणि नबी टीम इंडियासह इंग्लंडमधून यूएईला येऊ शकतात
पीटीआयच्या बातमीनुसार, एका सूत्राने सांगितले की, आताच काहीही सांगणे फार घाईचे ठरेल, परंतु आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आमच्यासाठी काहीही बदलले नाही. रशीद आणि इतर अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंनी आयपीएलचा भाग व्हावा अशी आमची अपेक्षा आहे.

21 ऑगस्ट रोजी द हंड्रेड लीग संपल्यानंतर रशीद आणि नबी इंग्लंडमध्ये राहतील की मायदेशी परततील हे पाहणे बाकी आहे. जर ते इंग्लंडमध्ये राहिले तर बीसीसीआय त्यांना त्यांच्याच चार्टर फ्लाइटने घेऊन येते का हे पाहणे रंजक ठरेल. जी 15 सप्टेंबर रोजी टीम इंडियाला मँचेस्टरहून यूएईला आणेल. राशिद आणि नबी दोघेही आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतात.

Leave a Comment