काबूल । अफगाणिस्तानचा माजी पंतप्रधान आणि हिज्ब-ए-इस्लामी गुलबुद्दीन (HIG) पक्षाचा प्रमुख गुलबुद्दीन हिकमतयारची गणना अफगाणिस्तानच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त व्यक्तींमध्ये केली जाते. एके काळी त्याला ‘बुचर ऑफ़ काबुल’ अर्थात काबूलचा कसाई म्हटले जात असे. अफगाणिस्तानच्या या माजी पंतप्रधानाने 80 च्या दशकात अफगाणिस्तानवर सोव्हिएतने कब्जा केल्यानंतर मुजाहिद्दीनांचे नेतृत्व केले. हा एक असा दहशतवादी आहे, ज्याला तालिबान सुद्धा मारू पाहत आहे. गुलबुद्दीन हिकमतयार कोण आहे आणि तालिबानशी त्याचे वैर काय आहे ते जाणून घेऊयात …
4 मे रोजी गुलबुद्दीन हिकमतयार सुमारे वीस वर्षांनी काबूलला परतला. शेकडो वाहनांच्या मोठ्या ताफ्यासह तो काबूलमध्ये दाखल झाला. यावेळी गाड्यांवर अनेक शस्त्रे देखील होती. मशीन गन चालू होत्या. काबूलमध्ये आल्यानंतर त्याने राष्ट्रपती भवनात प्रवेश केला आणि राष्ट्रपती अशरफ घनीची भेट घेतली. सप्टेंबर 2016 मध्येच, त्याने अफगाण सरकारसोबत शांतता करार केला. आता त्याला राजकीय जीवनात सक्रिय व्हायचे होते.
सुरुवातीचे आयुष्य
गुलबुद्दीन हिकमतयारचा जन्म 1949 मध्ये अफगाणिस्तानच्या गझनी शहरात झाला. त्याला 1968 मध्ये मिलिटरी अकादमीमध्ये पाठवण्यात आले. तो कट्टर इस्लामवादी होता. त्यामुळे त्याला मिलिटरी अकॅडमीतून काढून टाकण्यात आले. यानंतर त्याने काबूल विद्यापीठात प्रवेश घेतला. येथे त्याने एक सक्रिय इस्लामवादी असताना इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले. दहशतवाद्यांच्या गटात त्याला ‘इंजीनियर हिकमतयार’ असे म्हणतात.
काबूल विद्यापीठातच हिकमतयार अहमद शाह मसूदला भेटला. दोघे बराच काळ एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिले. ‘द प्रिंट’मधील एका रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, 1970 च्या मध्यातच हिकमतयार, मसूद आणि इतरांसह पाकिस्तानात पळून गेला कारण राष्ट्रपती मोहम्मद दाऊद खान यांच्या सरकारने इस्लामवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
सोव्हिएत युनियन विरुद्ध युद्धात भूमिका
1970 चा काळ होता जेव्हा अफगाणिस्तान सोव्हिएत युनियन आणि युनायटेड स्टेट्स दरम्यान प्रॉक्सी वॉरचे ठिकाण बनू लागला. त्या वेळी अफगाणिस्तानात सोव्हिएत समर्थक राजवटीविरुद्ध इस्लामवादी बंडखोरी सुरू झाली होती. व्हिएतनाम युद्धासाठी सोव्हिएत युनियनशी वाटाघाटी करण्याची संधी म्हणून अमेरिकेने याकडे पाहिले आणि मुजाहिदीनला आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली.
हिकमतयार हिज्ब-ए-इस्लामी नावाच्या एका इस्लामिक गटात सामील झाला होता, ज्याचे नाव नंतर बदलून हिज्ब-ए-इस्लामी गुलबुद्दीन असे ठेवले. हिज्ब-ए-इस्लामी गुलबुद्दीन पाकिस्तानातील तीन अफगाण शरणार्थी शिबिरांमध्ये प्रभाव टाकू शकला. तोपर्यंत हिकमतयार त्याचे कौशल्य आणि हुशारीमुळे अमेरिका आणि पाकिस्तानचा आवडता बनला होता. त्यामुळे हिकमतयारच्या संघटनेला अमेरिका आणि पाकिस्तानच्या ISI कडून लष्करी आणि आर्थिक मदत मिळाली. त्याला सौदी अरेबिया आणि ब्रिटननेही पाठिंबा दिला होता.
‘गृहयुद्धात हजारो लोकं मारली गेली’
1990 च्या दशकात अफगाणिस्तानमधील गृहयुद्धात हजारो लोकांचा बळी घेतल्याचा आरोप हिकमतयारवर होता. रिपोर्ट नुसार, हिकमतयारने मित्रांना सोडत होता ना शत्रूंना दया दाखवत होता. म्हणूनच त्याला ‘बुचर ऑफ़ काबुल’ म्हटले गेले.
तो तत्कालीन लष्करी कमांडर अहमद शाह मसूदचा कडवा प्रतिस्पर्धी असल्याचे म्हटले जाते. हिकमतयारच्या मदतीने मसूदला पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपाखाली 1976 मध्ये अटक करण्यात आली होती. मार्च 1990 मध्ये हिकमतयारने तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह यांच्याविरोधात बंडाचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
1992 ते 1996 दरम्यान, जेव्हा लढाऊ गटांनी काबूलचा बहुतेक भाग नष्ट केला आणि हजारो लोकांना ठार केले. तेव्हा त्यातील अनेक नागरिकांच्या हत्येलाही हिकमतयारच जबाबदार होता.
अफगाणिस्तानचा पंतप्रधान
1990 च्या दशकात हिकमतयारने दोन वेळा अफगाणिस्तानचा पंतप्रधान म्हणूनही काम केले. त्याने सरकार स्थापन केले आणि मे 1996 मध्ये पंतप्रधान झाला, मात्र तालिबानने सप्टेंबर 1996 मध्ये काबूलवर ताबा मिळवला आणि त्याला पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले.
तालिबान सत्तेवर आल्यानंतर तो पहिले पंजशीर प्रांतात आणि नंतर इराणमध्ये पळून गेला. 9/11च्या हल्ल्यानंतर तो पाकिस्तानात पळून गेला. तिथून तो हिज्ब-ए-इस्लामी गुलबुद्दीन चालवत राहिला.
असे म्हटले जाते की, 9/11 च्या हल्ल्यानंतर त्याने पुन्हा एक गट तयार केला आणि लढाई सुरू केली. त्याने ओसामा बिन लादेन आणि अयान अल-जवाहिरी यांना तोरा बोरा पर्वतांमधून पळून जाण्यास मदत केल्याचेही म्हटले जाते, ज्यांच्यावर अमेरिकेने या भागातून कार्यरत अतिरेक्यांना हाकलण्यासाठी हल्ला केला होता. 2010 पर्यंत, तो अमेरिकेविरुद्धच्या लढाईचा मुख्य चेहरा बनला होता.
अफगाणिस्तान सरकारशी संबंध
हिकमतयार आणि त्याच्या गटाने 2016 मध्ये अफगाण सरकारसोबत शांतता करार केला आणि त्याचे सर्व गुन्हे माफ झाले. मात्र, अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील लढाईत तो लढाऊ सैन्याचा भाग होता. यानंतर, त्याला सरकारमधील काही उच्च पदांचीही आशा होती. एकदा दहशतवादी ठरवला गेल्यानंतरही हिकमतयार अफगाणिस्तानच्या शांतता चर्चेचा एक भाग होता.