Monday, January 30, 2023

एक सामान्य शेतकरी ते पद्मश्री विजते! कसा आहे ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांचा प्रवास

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शेतीचा शोध महिलांनी लावला असं इतिहास सांगतो. नंतर शेतीवर पुरुषांनी आक्रमण केलं आणि शेती हा पुरुषांनी करायचा व्यवहार आहे रुढ झालं. प्रत्यक्षात शेतीच्या कामात महिला किती राबत असतात हे गावातल्या लोकांना चांगलं माहिती आहे. देशात आणि महाराष्ट्रातही शेतकरी आत्महत्येची दूर्दैवी लाट आली (जी अजूनही आहे) त्या वेळी पुरुष शेतकऱ्यांच्या माघारी त्यांच्या बायकांनी, मुलींनीच शेती सांभाळल्याचे असंख्य प्रेरक दाखले व उदाहरणं आपल्याकडे उपलब्ध आहेत. यात आणखी एक नाव आहे राहीबाई पोपेरे यांचं. त्याही शेतकरी आहेत. पण त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ पारंपरिक शेती न करता शेतीकडे संशोधकाच्या दृष्टीतून पाहिलं आणि त्यांतून सुरू झाला प्रवास एका बीज संकलनाचा.

राहीबाई पोपेरे (जन्म : इ.स. १९६४) या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली पद्मश्री पुरस्कार दिला होता. राहीबाई मूळच्या याच गावच्या. राहीबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बँकेत’ आज ५२ पिकांचे ११४ वाण आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा ‘सीड मदर’ म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला होता. तेव्हापासून त्या बीजमाता म्हणून ओळखल्या जातात. बीबीसीने २०१८ साली शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.

- Advertisement -

राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार स्त्रीया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या ‘बीजमाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे यांचा महिला दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेला गौरव आणि त्यांना मिळालेला ‘नारीशक्ती’ सन्मान ही त्यांच्या आजवरच्या कामाची पोचपावती आहे. हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी कृतिशील प्रयत्न करणाऱ्या राहीबाईंचा जन्म कोंभाळणे गावातला. औपचारिक शिक्षण नाही. पण लहानपणापासून शेतीची आवड. त्याचेही त्यांना शास्त्रीय ज्ञान होते, असे काही नाही. त्या लहान असताना वडिलांचे ‘जुने ते सोने’ हे विचार त्यांना भावले. त्यातूनच त्यांनी पुढे भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा, त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला.

सुमारे वीस वर्षांपासून त्यांचे हे काम अथक सुरू आहे. गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील सुमारे चारशे एकर जमिनीवर त्यांच्या प्रेरणेतून गावरान वाणांची शेती केली जाते. त्यांनी जपलेले बियाणे राज्यातील अनेक जिल्ह्यांत आणि परराज्यांतही एव्हाना पोहोचले आहे. वांगी, भेंडी, पेरू, आंबा, पालक, मेथी, वाटाणा आदी पिकांच्या जातींची बियाणे त्यांनी निगुतीने जपली. सध्या तीन हजार महिलांसमवेत त्या काम करतात.

त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. विविध ठिकाणी व्याखाने, प्रशिक्षणासाठी त्यांना सतत निमंत्रणे येतात. अशाच कार्यक्रमात त्यांची भेट तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झाली. परिस्थिती बेताची असल्याने राहीबाईंची बीज पेढी अपुऱ्या जागेत आणि जुन्या घरात चालत होती. महसूलमंत्र्यांनी या बँकेसाठी नव्या इमारतीची घोषणा केली आणि ती प्रत्यक्षात आली. पुरस्कार आणि नवी इमारत राहीबाईंना बळ देणारे असून यातून या कामाच्या विस्तारास मदत होत आहे.

जगभरात देशी वाणांची कमतरता भासत असतांना राहीबाई जे काम करत आहे त्याचं महत्त्व अमाप आहे. न शिकलेल्या लोकांना विशेषतः गावातील लोकांना आपण अडाणी गावंढळ गावठी निरक्षर म्हणून मोकळे होतो. पण केवळ शिकून माणूस सुसंस्कृत किंवा शहाणा होत नसतो. शहाणपण ही उपजत बाब असते. तिचा औपचारीक शिक्षणाशी संबंध नसतो. गावातलं हे शहाणपण आपण जपायला पाहिजे. त्याचा आदर करायला पाहिजे. राहीबाई त्याचं एक प्रेरक उदाहरण आहेत. अशी कित्येक माणसं आपल्या देशात आहे ज्यांनी त्यांच्या त्यांच्या जागी राहून काही एक विशेष काम केलं आहे. या लोकांचा सन्मान करणं ही आपल्यासाठी आनंदाची व अभिमानाची बाब असायला हवी.
– प्रतिक पुरी

माहिती संदर्भः इंटरनेट