कोरोनाविरुद्ध लढण्याचा इस्लामपूर पॅटर्न, २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त – जयंत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सागली प्रतिनिधी | जिल्ह्यातील इस्लामपूर शहरातील एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ वर पोहोचल्याने सांगलीकर चिंतेत होते. मात्र आता योग्य पावले उचलल्याने सांगलीतील २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाविरुद्धच्या सांगली पॅटर्नबाबत आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

यावेळी, तुम्हा सर्वांना सांगण्यात आनंद होतोय की सांगलीतील २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण आता कोरोनामुक्त झालेत. आपण कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतोय असं पाटील यांनी म्हटले आहे. तसेच जिल्ह्यात २६ रुग्ण आढळल्याने पालकमंत्री व इस्लामपूर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून दुहेरी दडपणात होतो, मात्र आता दिलासा मिळाला आहे असंही पाटील यांनी सांगितले.

तसेच कोरोनाविरुद्ध लढण्याचा सांगली पॅटर्न कसा आहे? आपण यात कसे यशस्वी झालो याबाबत सांगताना पाटील यांनी, “जिल्ह्यातील नागरिकांशी व प्रशासनाशी चर्चा करून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी विलगीकरण, समुह संसर्गाच्या ठिकाणाची ओळख, तात्काळ कार्यवाही या त्रिसूत्री धोरणाला आम्ही जिल्ह्यात अंमलात आणले. प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने आम्ही कोरोनाच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यात यशस्वी झालोय” असे सांगितले.

आज मी काहीसा चिंतामुक्त झालोय! माझ्या इस्लामपूर मतदारसंघातील जे कुटुंब कोरोनाबाधित झाले होते ते आज पूर्णपणे कोरोनामुक्त झालंय. सांगली जिल्ह्यामध्ये यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची मला खात्री आहे. पण अद्यापही लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे असे आवाहनही पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, सांगलीच्या जनतेने दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. नागरिकांनी विलगीकरणाचा राबवलेला प्रयोग १०० टक्के यशस्वी केल्याने आपण यावर मात करू शकलो. पण गाफील राहू नका. माझी महाराष्ट्रातील जनतेस विनंती आहे, शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करा तर आणि तरच आपण या रोगावर विजय मिळवू शकू असं पाटील यांनी म्हटले आहे.

कोविड-19 वर मात करण्यासाठी ‘इस्लामपूर पॅटर्न’


विलगीकरण –

ज्या कुटुंबातील लोकांना कोरोनाची बाधा झाली होती, अशा लोकांना तात्काळ विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले. तसेच या लोकांच्या संपर्कात आलेल्या दुय्यम व तृतीय साखळीतील लोकांची ओळख पटवून त्यांचेही विलगीकरण तात्काळ करण्यात आले.

समुह संसर्गच्या ठिकाणाची ओळख –

संभाव्य समुह संसर्गाचे ठिकाण ओळखून अशा व्यक्तींना त्या ठिकाणी स्थानबध्द करण्यात येऊन आशा वर्कर मार्फत त्यांची दररोज आरोग्य तपासणी करून त्यांचे निरीक्षण करण्यात येत होते.

तात्काळ कार्यवाही –

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इस्लामपूर शहरातील व जिल्हयातील लोकांच्या हालचालींवर नियंत्रण आणले व सोशल डिस्टन्स कटाक्षाने पाळण्याच्या सुचना केल्या.

मला आता आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की, गेल्या १० दिवसांपासून प्रशासनातील सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच सर्वसामान्य जनता यांच्या सहकार्याने आज रोजी आम्ही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. ज्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित झाले होते ते आता पूर्णपणे कोरोनामुक्त झालेले आहेत. आज मी काहीसा चिंतामुक्त झालेला असून, इस्लामपूर व सांगली जिल्ह्यामध्ये यापुढे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची मला खात्री आहे. परंतु अद्यापही लॉकडाऊन सुरु असल्याने सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे कसोशीने पालन केले पाहिजे. कोणीही गाफील राहता कामा नये. सर्वानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

या लढाईमध्ये इस्लामपूरकर व सांगली जिल्ह्याने दिलेले योगदान हे अत्यंत कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील सर्व नागरिकांनी विलगीकरणाचा राबविलेला प्रयोग १०० टक्के यशस्वी झाल्यामुळे याच्यावर मात करणे शक्य झाले. माझी महाराष्ट्रातील सर्व जनतेस विनंती आहे की, त्यांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून विलगीकरणामध्येच रहावे. जेणेकरुन या जीवघेण्या रोगावर विजय मिळविणे शक्य होईल.