कौतुकास्पद! दिवसभर हाॅटेलमध्ये काम करुन रात्रशाळेत शिकणार्‍या कुणालचे 12 वी घवघवीत यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल४.७८ टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती मिळाली आहे. कला शाखेचा निकाल ८२.६३, वाणिज्य शाखेचा ९१.२७, विज्ञान शाखेचा निकाल ९६.१३ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विभागानुसार कोकण बोर्डानं बाजी मारली आहे. विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यात ‘पूना नाईट स्कूल’ मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यानं घवघवीत यश संपादन केलं आहे. कुणाल सुरेश बेंडल असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्यानं हॉटेलमध्ये काम करून बारावीची परीक्षा दिली होती. कुणाल हा परीक्षेत ७७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. एवढंच नाही तर कुणाल याने शाळेत दुसरा क्रमांकही पटकावला आहे.

कुणाल हा मूळचा कोकणातील आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील खिर्शीद या गावात कुणालचं छोटसं घर आहे. घरीची परिस्थिती हालकीची आहे. त्यामुळे कुणाल याचं दहावीपर्यंत शिक्षण गावीच झालं. दहावीनंतरचं शिक्षण घेण्यासाठी कुणाल पुण्यात आला. त्यानं आधी एका हॉटेलमध्ये काम मिळवलं. नंतर ‘पूना नाईट स्कूल’मध्ये अकरावीत प्रवेश घेतला. अकरावीतही कुणाल याला चांगले गुण मिळाले. पण बारावीच्या परीक्षेचं खूप टेंशन होतं, असं कुणालनं सांगितलं. दिवसा हॉटेलमध्ये काम करून कुणाल रात्र शाळेत शिक्षण घेतलं आणि परीक्षेत मोठं यश संपादन केलं आहे.

आजच्या निकालानं कुणाल याच्याही पंखांना बळ मिळालं आहे. कुणाल पुढे पदवीचे शिक्षण घेणार आहे. सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) व्हायचं त्याचं स्वप्न आहे. दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट ज्युनिअर कॉलेज, पूना नाईट स्कूलचा १२वी वाणिज्य शाखेचा ८२टक्के इतका निकाल लागला आहे. रात्र शाळेतून ११४ मुले बसली  होती. त्यापैकी ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.