गुप्तधनासाठी नरबळी : करपेवाडीत आजीनेच घेतला नातीचा जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पाटण तालुक्यातील तळमावले गावापासून काही अंतरावर असलेल्या करपेवाडी येथील महाविद्यालयीन 16 वर्षीय युवतीचा घरी परतताना 2019 साली खून झाला होता. अखेर साडेतीन वर्षानंतर या खुनातील आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून खूनाचा उलगडा करण्यात आला आहे. नातीचा आजीनेच गुप्तधनासाठी नरबळी दिल्याची माहिती समोर आलेली असून या गुन्ह्यात मांत्रिकासह 5 जण पोलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी युवतीच्या कुटुंबातील आजीला काल पोलिसांनी चाैकशीला ताब्यात घेतले होते. गेल्या साडेतीन वर्षापूर्वी 22 जानेवारी 2019 रोजी भाग्यश्री माने ही तळमावले येथून काॅलेजवरून घरी परतत असताना तिचा खून झाला होता. त्यानंतर भाग्यश्रीचा खून अधंश्रध्देतून झाल्याचा संशय पोलिसांना होता. तसेच घरातील लोकांचाच या खूनात सहभाग असल्याचाही संशय पोलिसांना होता. त्यामुळे भाग्यश्रीचे वडिलांना चाैकशीसाठी काही दिवस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु ठोस पुरावे न मिळाल्याने त्यांनाही सोडण्यात आले होते.

काल भाग्यश्रीच्या आजीला ढेबेवाडी पोलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले होते. या प्रकरणात कुटुंबातीलच एका व्यक्तीचा हात असल्याचे निष्पन्न झाले. तरीही कुटुंबातील अन्य सदस्यासह एकूण 5 जणांकडे पोलिसांनी कसून चाैकशी सुरू ठेवली आहे. तसेच अन्य काही माहिती समोर येते का यादृष्टीने पोलिस अजूनही तपास करीत आहेत. आजीनेच नातीचा खून केल्याचे तपासात समोर आल्याने पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सदरील घटनेची सविस्तर माहिती उद्या सातारा येथे पत्रकार परिषदेत देण्यात येणार असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment