चंद्रग्रहण आणि पौर्णिमेच्या मुहूर्तावर भाग्यश्रीचा नरबळी : मांत्रिकांसह 4 जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

साडेतीन वर्षांपूर्वी एका सोळा वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा खून झाल्याची घटना पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे घडली होती. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ३ वर्षानंतर मुलीची आज्जी दोषी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. गुप्तधनासाठी चंद्रग्रहण आणि पौर्णिमेच्या दिवशी स्वतः आजीनेच नातीचा नरबळी घेतला असल्याचं स्पष्ट झाले आहे. सातारा पोलिसांनी कारवाई करत आरोपी आजीसह फसवणूक करणारे दोघे मांत्रिक व अन्य एक महिला अशा एकूण चौघांना अटक केली आहे.

आरोपींना अटक केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा येथे आज पत्रकार परिषद घेतली. घटनेच्या अनुषंगाने केलेल्या तपासाबाबत त्यांनी अधिक माहिती दिली. करपेवाडीत महाविद्यालीन युवतीचा खून झाल्याची घटना घडल्यानंतर प्रथम तिच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता या घटनेत अजून काही जणांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांची काही पथके तयार करून ती अनेक ठिकाणी पाठवण्यात आली. मात्र, पोलिसांना युवतीच्या घराच्या परिसरातच आरोपी असल्याचा संशय होता. युवतीच्या खुनाचा तपास सुरु असताना युवतीच्या गावातील एक व्यक्ती मांत्रिकाकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे व मुलीच्या आजीकडे चौकशी केली. मांत्रिकाच्या साहाय्याने स्वतःच्या नातीचा नरबळी दिल्याची कबुली आजीने यावेळी दिली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1084062935536266

पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर युवतीची आज्जी रंजना लक्ष्मण साळुंखे हिच्यासह कमला आनंद महाबुरे, मांत्रिक फुलसिंग राठोड (रा. विजापूर, कर्नाटक), विकास उर्फ विक्रम राठोड ( रा. सोलापूर) यांना काल अटक केली आहे. अंधश्रद्धेतून युवतीचा नरबळी देण्याचा मुख्य हेतू होता हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात असून अजून काही आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती बन्सल यांनी दिली.

मांत्रिकाचे ऐकून नातीचा बळी दिला आणि आम्ही फसलो गेलो –

याबाबत पोलिसांनी आजीला ताब्यात घेत तिची चौकशी केली असता तिने नातीचा खून केल्याची कबुली दिली. “साहेब घरातल्या कचकचीमुळे मी माझ्या नातीचा बळी दिला. पण आम्ही चुकलो, नातीचा बळी देऊन सुद्धा कोणताही फायदा झाला नाही.आम्हाला फसवलं गेलं आहे. आम्ही फसलो गेलो आहोत,” असे आजीने म्हंटले.

नागरिकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेऊ नये –

यावेळी पोलीस अधीक्षक बन्सल यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहनही केले. ते म्हणाले की, नागरिकांनी कोणत्याही स्वरुपाच्या अंधश्रद्धेतुन आणि जादूटोणा करणाऱ्यांवर विश्वास ठेऊ नये. जर कोणी अंधश्रद्धेतुन जादूटोणा करताना आढळल्यास संबधीतांवर जादूटोणा कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment