हुंबरणे गावाची वाट बंद : वनक्षेत्रपालांच्या गलथानपणामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | हुंबरणे (ता. पाटण) हे मोरणा खोऱ्यातील गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असून ह्या गावाला जाणारा 800 (आठशे ) मीटर रस्ता वन हद्दीतून जातो. मार्च अखेरीला वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर राक्षे यांनी घाई गडबडीने 800 मीटर रस्त्याकडेला गटार काढले व त्याची माती रस्त्यावरच टाकली. या वनक्षेत्रपाल राक्षे यांच्या मनमानी कारभारामुळे आता वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे रहिवाशांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे.

तीन महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी या मातीवर पाऊस पडला तर चिखल होईल व त्यामुळे गाडीवाट बंद होईल अशी भीती व्यक्त केली होती. तसेच वनक्षेत्रपाल राक्षे यांच्याकडे रस्त्यावरील माती काढण्यासाठी वारंवार विनंती केली. परंतु रस्त्यावरील माती काढण्यात आली नाही. परिणामी पहिल्याच पावसात रस्त्यावर चिखल होऊन एकमेव वाहतुकीला साधन असणारी जीप हुंबरणे गावात जाणे बंद झाली आहे.

चिखलात रुतून बसलेली जीप बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांना दोर लावावा लागला. वास्तविक कामाच्या अंदाजपत्रकात रस्त्याकडेला गटर काढून त्याची माती दूर टाकण्याची तरतूद होती.  परंतु वनक्षेत्रपाल राक्षे यांनी नेमलेल्या ठेकेदाराने माती रस्त्यावरच टाकली गेली. तीन महिने ग्रामस्थ वनक्षेत्रपालांना माती काढण्यासाठी सांगत होते. परंतु त्याकडे कानाडोळा केला गेला.

गाडीची वाट बंद, लोकांचे हाल सुरू

हुंबरणे गावाचा रस्ता बंद झाल्यामुळे पांढरेपाणी व हुंबरणे येथील ग्रामस्थांना दुध घालण्यासाठी डोंगरातून पायपीट करून काहीर येथे यावे लागत आहे. हुंबरणे व पांढरेपाणी साठी रोज एक जीप दुध गोळा करण्यासाठी येते. सध्या गाडीची वाट बंद असल्यामुळे एखादा ग्रामस्थ आजारी पडल्यास त्यास रितसर 800 मीटर डोली करून पलीकडे घेऊन जावे लागते. गाडीची वाट बंद असल्यामुळे लोकांचे हाल सुरु आहेत. यासाठी सर्वस्वी जबाबदार वनाधिकारी राहतील असे हुंबरणे गावचे ग्रामस्थ पांडुरंग चाळके यांनी सांगितले.

Leave a Comment