सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली विश्रामबाग परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या ओपनस्पेस जागेतील बेकायदेशीर व विनापरवाना सुरू असणारी झाडांची कत्तल राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आज उघडकीस आणली. महापालिकेच्या कंत्राटदाराने कंत्राट संपलेले असतानाही बेकायदेशीर वृक्षांची कत्तल सुरू ठेवली होती. सदरचा प्रकार निदर्शनास येताच नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी ही कत्तल बंद पाडून तोडलेल्या शेकडो झाडांसह ट्रक पोलीस ठाण्याच्या आवारात आणला.
सदरचा प्रकार समजताच महापालिकेचे उद्यान निरीक्षक तातडीने दाखल झाले. या प्रकरणी आता विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, खुलेआम वृक्षांची सुरू असणारी कत्तल कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती याची चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे.
दरम्यान, ज्या व्यक्तीकडे झाडे तोडण्याचे कंत्राट होते त्याने फक्त निलगिरीची झाडे तोडण्याचे आदेश असताना त्याने या परिसरातील सर्व झाडे तोडली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आता महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.