सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
ढवळी येथे दुपारच्या सुमारास दोनशे एकर ऊस शेतीला भीषण आग लागली. यामध्ये शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी वेळीच घरातील नागरिकांना व गोठ्यातील जनावरांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ढवळी-वड्डी कुटवाड रस्ता येथील काही शेतकऱ्यांच्या ऊस शेतीला आग लागली.
काही क्षणातच ही आग शेजारील अन्य उसाच्या शेतापर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली; पण आगीने थोड्याच अवधीत रुद्रावतार धारण केले. दोन तासात बघता बघता परिसरातील सुमारे दोनशे एकर ऊस शेतीला आगीने आपल्या कवेत घेतले. अग्निशमन दल फौजफाट्यासह घटनास्थळी त्वरित दाखल झाले.
आग लागलेल्या परिसरात काही नागरिकांची घरे व जनावरांचे गोठे आहेत. शेतानजीक त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांना आगीचा धोका होता. यामुळे अग्निशमन दलाचे जवान लिंगप्पा कांबळे अमोल गडदे व तानाजी पाटील यांनी घरातील सर्व नागरिक व गोठ्यातील जनावरांना बाहेर काढले. यानंतर घराशेजारील उसाच्या शेतातील आग शमविली. यामुळे घरे व गोठे सुरक्षित राहिले.