कुलर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ, चार तास सुट देण्याची मागणी

औरंगाबाद | कोरोना निर्बंधांमुळे सध्या बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुलर व्यवसाय अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत दुकानांना चार तास सूट देण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे.

औरंगाबाद शहरात ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने कडक निर्बंध लावल्याने 30 एप्रिलपर्यंत बाजारपेठा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना तर बसत असून व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अशी भयावह परिस्थिती असताना कुलर व्यावसायिक मात्र चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात कुलरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे या व्यवसायातून लाखोंची उलाढाल होते. परंतु कोरोनामुळे या व्यवसायाला घरघर लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सध्या उन्हाळा असल्याने कुलरचे दोन महिन्याचे सिजन उरलेले आहे. हजारो लोक या व्यवसायावर अवलंबून असतात. जिल्हाधिकारी यांनी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने शासनाच्या नियमांचे पालन करत उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदन देवून वातानुकूलित कुलर व्यवसायिकांनी केली आहे.

भाजपाचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनीही या विषयावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी चर्चा केली. हा व्यवसाय बंद झाल्याने मोतीकारंजा मार्केट सामसूम झाले आहे. व्यवसायिक व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे तरी शासनाने गंभीरपणे विचार करावा, अशी मागणी सय्यद अब्बास, सय्यद अजीम, मिर्झा रियाज, पवन साकला, रईस खान यांनी केली आहे.

You might also like