लस घेतली असेल तरच आरटीओ कार्यालयात प्रवेश

औरंगाबाद | आरटीओ कार्यालयातील पर्मनंट आणि लर्निंग लायसन्सचे कामकाज 30 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आले आहे. तसेच लस घेतलेली असेल तरच आरटीओ कार्यालयात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. त्याखालील नागरिकांचे काय, असा प्रश्न वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे आरटीओ कार्यालयातील पर्मनंट, लर्निंग लायसन्सची चाचणी 11 मार्चपासून बंद आहे. या चाचणीला 5 एप्रिलपासून सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता 30 एप्रिलपर्यंत या दोन्ही लायसेन्ससाठी चाचणी घेण्यात येणार नाही.

तसेच सरकारी कार्यालयांत येणार्‍या अभ्यागतांना लस घेतलेली असेल तरच प्रवेश द्यावा, याचा ब्रेक दी चेनमध्ये समावेश आहे. त्यानुसार आरटीओ कार्यालयातील कर्मचारी फ्रंटलाइन वर्कर्समध्ये आहेत. त्यामुळे बहुतांश जणांनी लस घेतलेली आहे. 45 वर्षांखालील लोकांविषयी गाइडलाइन येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले. त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

You might also like