Friday, June 2, 2023

बॅनरवर नाव टाकण्यावरुन दोन गटात तुफान हाणामारी आणि गोळीबार

जालना – तालुक्यातील रामनगर येथे दोन गटांमध्ये वाद होऊन तुफान हाणामारी झाली. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान दोन गटांत झालेल्या तुफान हाणामारीत गोळीबार होऊन एक जण गंभीर जखमी झाला. मौजपुरी ठाण्याच्या पोलिसांनी वेळीच बंदोबस्त मागून परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला.

रामनगर येथून जाणाऱ्या जालना-नांदेड या राज्य महामार्गावर मुख्य चौकात बॅनर लावण्याच्या कारणावरून शिवसेना कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात बुधवारी रात्री वादावादी झाली. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी वादाचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाले. बॅनर लावण्याच्या कारणावरून झालेल्या तुफान हाणामारीत गोळीबार होऊन विजय ढेंगळे (वय २२) हा तरुण गंभीर जखमी झाला.

दरम्यान मौजपुरी पोलिसांनी जास्तीचा पोलिस बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पक्षीय राजकारणामुळे झालेल्या या तुफान हाणामारीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पुढील कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मौजपुरी पोलिस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.