सातारा | सातारा पोलिस मुख्यालयासमोर असलेल्या सिटी पोलिस लाईनीत बुधवारी सकाळी घरामध्ये आग लागून पोलिस पती व पत्नी असलेले दाम्पत्य भाजले. या घटनेत महिला पोलिस गंभीर जखमी असून अधिक उपचारासाठी त्यांना पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार भडका झाल्याने ही घटना समोर आल्याचा प्राथमिक जबाब महिला पोलिसाने दिला आहे. महिला पोलिस संगिता जेटाप्पा लोणार (काळेल) व पती जेटाप्पा लोणार (दोघे रा. पोलिस वसाहत, सातारा) असे जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संगीता या भरोसा सेलमध्ये तर जेटाप्पा हे महामार्ग पोलिस म्हणून कर्तव्य बजावत आहेत. बुधवारी सकाळी सिटी पोलिस लाईनीत ते राहत असलेल्या घरातून धूराचे व आगीचे लोट येवू लागल्याने परिसर हादरुन गेला. आरडाओरडा झाला असता लोणार दाम्पत्य भाजल्याचे समोर आले. यामध्ये पत्नी संगीता या 55 टक्के भाजल्याने व त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुणे येथे उपचारार्थ हलवले आहे.
जखमी अवस्थेत दोघांना तात्काळ उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात हलवले. सातारा पोलिस दलात या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. महिला पोलिसाचा प्राथमिक जबाब घेतला आहे.
याबाबत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, “दोन्ही पोलिसांवर उपचार सुरू आहेत. प्राथमिक जबाब झाला आहे. उपचारानंतर आणखी दोन दिवसांनी पुन्हा जबाब घेतला जाणार आहे. याप्रकरण कोणतीही तक्रार असेल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.